Pimpri News : मालमत्ताकर वसुलीसाठी कर्मचा-यांना ‘कॅश रिवॉर्ड’

10 हजारापासून 50 हजारापर्यंत बक्षिस मिळणार

एमपीसी न्यूज – करसंकलन विभागीय कार्यालयांमध्ये वसुलीविषयक स्पर्धा होऊन महापालिकेच्या महसुली उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, यासाठी महापालिकेमार्फत करसंकलन विभागातील कर्मचा-यांकरिता प्रोत्साहनपर बक्षीस योजना लागू करण्यात येणार आहे. विभागीय कार्यालयस्तरावर राबविण्यात येणा-या या योजनेत सहायक मंडलाधिका-यापासून गट समन्वयक, गट लिपिक किंवा  गट प्रमुख यांचा सहभाग असणार आहे. या योजनेअंतर्गत 10 हजारापासून 50 हजारापर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत.

महापालिका हद्दीतील इमारती व जमिनी यावर मालमत्ताकराची आकारणी करण्यात येते. कर आकारणी व करसंकलन विभागाचे करआकारणी व करवसुलीचे कामकाज करसंकलन मुख्य कार्यालय व 16 करसंकलन विभागीय कार्यालयामार्फत चालते. महापालिका महसुली उत्पन्नामध्ये वाढ करणे, अंदाजपत्रकीय उद्दीष्टांची पूर्तता करणे याकरिता करसंकलन विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

त्यामध्ये विभागाच्या विविध सवलतींचे फ्लेक्स किंवा बॅनर्स शहरातील मुख्य चौकात उभारणे, खासगी रेडीओ मार्फत जिंगल्स प्रसिद्ध करणे, थकीत मालमत्ताधारकांना घरभेटी देणे, जप्तीपूर्व नोटीसा बजावणे, अंतिमत: जप्ती कार्यवाही करणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

तथापि, थकीत मालमत्ताकराची जास्तीत जास्त वसुली करून पर्यायाने महापालिकेच्या सर्वांगिण विकासकामास हातभार लागावा याकरिता करसंकलन विभागातील कर्मचा-यांकरिता प्रोत्साहनपर बक्षीस योजना लागू करण्यात येणार आहे. यामुळे सर्व करसंकलन विभागीय कार्यालयांमध्ये वसुलीविषयक स्पर्धा होऊन महापालिकेच्या महसुली उत्पन्नामध्ये वाढ होईल.

सन 2021-22  या वर्षातील मालमत्ताकर वसुलीवर करसंकलन विभागातील कर्मचा-यांसाठी राबविण्यात येणा-या प्रोत्साहनपर बक्षिस योजनेअंतर्गत 50 हजारापासून 10 हजारापर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. विभागीय कार्यालयस्तरावर राबविण्यात येणा-या या योजनेत सहायक मंडलाधिका-यापासून गट समन्वयक, गट लिपिक किंवा गट प्रमुख यांचा सहभाग असणार  आहे.

मालमत्ताकराच्या वसुलीतून मिळालेले उत्पन्न व त्यांच्या निव्वळ मागणीच्या तुलनेत झालेल्या वसुलीची टक्केवारी यानुसार गुणवत्ता आधारीत निवड करून बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहायक मंडलाधिका-यांसाठी प्रथम क्रमांकाकरिता 50 हजार रूपये, द्वितिय क्रमांकासाठी 40 हजार तर तृतिय क्रमांकासाठी 30 हजार रूपये बक्षिस असणार आहे. गट समन्वयकांसाठी प्रथम क्रमांकाला 25 हजार रूपये मिळणार आहेत.

गट लिपिक किंवा गट प्रमुख यांच्यासाठी प्रथम क्रमांकाकरिता 30 हजार रूपये, द्वितिय क्रमांकासाठी 25 हजार, तृतिय क्रमांकासाठी 20 हजार, चतुर्थ क्रमांकासाठी 15 हजार तर, पाचव्या क्रमांकासाठी 10 हजार रूपये बक्षिस मिळणार आहे. प्रत्येक बक्षिसार्थींना प्रशस्तीपत्रही देण्यात येणार आहे. हा खर्च करसंकलन विभागाच्या मालमत्ताकर वसुली खर्च या लेखाशिर्षातून करण्यात येणार आहे.  हा विषय आगामी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.