Chakan Crime News : दरोडा आणि जबरी चोऱ्या करणाऱ्या तिघांना बेड्या; 2 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून 38 हजारांचे दोन मोबाईल फोन दरोडा घालून चोरून नेले. या गुन्ह्यातील आणि चार जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीन आणि म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विष्णु आनंदा नरवाडे (वय 21, मूळ रा. मरकळ रोड, आळंदी. सध्या रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे), कृष्णा बाळासाहेब सोनवणे (वय 20, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे), आकाश कैलास ठोसर (वय 20, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी कुरुळी फाटा परीसरामध्ये अनोळखी पाच दरोडेखोरांनी रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याचे 38 हजारांचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. या गुन्ह्याचा समांतर तपास म्हाळुंगे पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट तिनचे पोलीस करत होते. या गुन्ह्यातील काही आरोपी आंबेठाण येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

दरोड्याच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा मुख्य साथीदार विष्णू नरवाडे हा असून तो मित्रासह कुरळी फाटा येथे गुन्हयातील मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वेषांतर करून सापळा लावून पोलिसांनी तिघांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींकडून 14 मोबाईल फोन, एक कोयता असा एकूण 2 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे दरोड्याचा एक आणि जबरी चोरीचे चार असे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी विष्णू नरवाडे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. गुन्हे घडल्यापासून तो फरार होता. म्हाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.