Chakan : अल्पवयीन मुलांना गाडी देताय ? मग कारवाईला तयार राहा;चाकण वाहतूक पोलिसांकडून कारवाया सुरु

चाकणला दोन दिवसांत 34 कारवाया

एमपीसी न्यूज- वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या पालकांवर (Chakan)कायदेशीर कारवाई चाकण ( ता.खेड ) शहरात सुरु करण्यात आली आहे.

चाकण शहर वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाया सुरु केल्या आहेत. पुढील काळात सातत्याने हि कारवाई केली जाणार असून थेट पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडीची चावी देणाऱ्या पालकांनी सावध राहावे, असा इशाराच वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे या मुलांना (Chakan)अटकाव करण्यासाठी त्यांच्या पालकांना कायद्याच्या कचाट्यात ओढण्याचा मार्ग पोलिसांनी स्वीकारला आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार चाकण मध्ये मागील 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला असून, वाहतूक नियमभंग प्रकरणातही अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा पोलिसांनी उचलला आहे.

चाकण वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक वर्षा पाटील यांनी सांगितले कि, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले विनापरवाना वाहने चालवत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे वाहन मालक यांना देखील त्याचा भुर्दंड बसत आहे. मागील दोन दिवसांत चाकण शहरात रविवारी ( 7 एप्रिल रोजी ) 10 आणि सोमवारी ( दि. 8 एप्रिल रोजी ) 24 कारवाया करण्यात आल्या आहेत. चालक अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कारवाईला मर्यादा आहेत. मात्र वाहन मालकाला 10 हजारांचा दंड करण्यात येत आहे. त्यात विनापरवाना , ट्रिपल सीट अशा प्रकारे नियम मोडणाऱ्या चालक आणि मालकांना मोठा दंड करण्यात येत आहे.

वाहतुकीच्या दंडाच्या रकमा प्रचंड वाढलेल्या आहेत. त्या बाबत नागरिकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहने देऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक वर्षा पाटील यांनी केले आहे.

 

TDR : टीडीआर घोटाळा? संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनास दोन महिने पूर्ण; अद्याप कारवाई नाही
पालकांनो सावधान ….
वाहन चालविण्यासाठी परवाना वयाच्या 18 वर्षानंतर मिळतो. तरीही काही पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देत असतात. अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणाऱ्या पालकांना मोठा दंड होणार असल्याची तरतूद कायद्यात केली असून पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन चाकण वाहतूक विभागाने केले आहे.

अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालविण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. अठरा वर्षाखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे वाहन चालविण्याची परवानगी पालकांनी, वाहन चालकांनी देऊ नये, अन्यथा पुढील काळात सातत्याने अशा मोठ्या दंडात्मक कारवाया आणि गुन्हे दाखल होणार असल्याचे स्पष्ट संकेत वाहतूक विभागाने दिले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.