Chakan: दगडाने ठेचून खून; हत्येचा व्हिडीओ बनवून दहशत, दोन अल्पवयीन  ताब्यात

 एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन अल्पवयीन तरुणांनी एकाची हत्या (Chakan)केल्याची धक्कादायक घटना चाकण ( ता. खेड ) येथील चाकण सौंदर्य सोसायटीच्या जवळील भागात सोमवारी (दि. 26 फेब्रुवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.
मंगळवारी (दि. 27फेब्रुवारी)  पहाटे हा प्रकार सोशल माध्यमातून समोर आला. धक्कादायक म्हणजे हा निर्घृण प्रकार करणाऱ्यांनी हत्येचा आणि त्यानंतर हत्येची माहिती देणारा व्हिडिओ काढून सोशल माध्यमात आणि स्टेटसवर ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने चाकण परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
प्रणव शंकर लोंढे (वय17वर्षे सध्या रा. अमृतनगर , मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. पारनेर , अहमदनगर ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रघुनाथ मारुती लोंढे ( वय 65, रा, मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. कान्हूरपठार, ता. पारनेर, जि. अहमदनगर ) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Alandi: आळंदीमध्ये संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा 

खून करणारे दोन्ही तरुण अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  यातील खून करणारा अल्पवयीन युवक आणि प्रणव लोंढे हे एकमेकांचे मित्र होते. त्यांच्यात दोन वर्षापूर्वी भांडण झाले होते. त्याच भांडणाचा राग मनात धरून प्रणव यास सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास चाकण आंबेठाण रस्त्यावर चाकण सौंदर्य सोसायटीच्या समोरील मोकळ्या जागेत नेण्यात आले.
तेथेच दोघांनी मिळून प्रणव याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड घालून त्याला ठार मारण्यात आले. धक्कादायक म्हणजे या खुनाचे मोबाईल मध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानंतर यातील आरोपीने कॅमेर्याच्या समोर येऊन आपण खून केल्याचे सांगितले.
त्यानंतर हा व्हिडीओ सोशल माध्यमात आणि आरोपींनी आपल्या स्टेटसवर ठेवत दहशतीचा थरार केला. सोशल माध्यमात आणि आरोपींच्या स्टेटस ठेवण्यात आलेला हा व्हिडीओ प्रणव याच्या काही मित्रांनी प्रणवच्या घरच्यांना दाखवला. त्यानंतर त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आणी नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दगडाने चेहरा ठेचलेला प्रणव याचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी तत्काळ यातील दोन अल्पवयीन संशयिताना ताब्यात घेतले आहे. चाकण पोलीस या बाबतचा अधिक तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.