Pimpri News : पत्रकारितेतील व्याप्तीसह आव्हाने वाढली – राजेश पाटील

‘दर्पण सन्मान’च्या वतीने पत्रकारांच्या कार्याचा  गौरव  

एमपीसी न्यूज : पत्रकारिता क्षेत्र दिवसेंदिवस बदलत आहे. काळानुरुप या क्षेत्रातील व्याप्तीसह परिणामी त्यातील आव्हाने देखील वाढत आहेत असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्ताने 6 जानेवारी रोजी आयोजित ‘दर्पण सन्मान’ प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

सिझन ग्रुप सोशल वेलफेअर सोशल ट्रस्ट, थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पण पुरस्कारा’ने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. चिंचवडच्या ‘पैस रंगमंच’ येथे  हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सिझन ग्रुप सोशल वेलफेअर सोशल ट्रस्टचे प्रमुख प्रशांत शितोळे, थिएटर वर्कशॉप कंपनीचे अध्यक्ष प्रभाकर पवार, पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते.

राजेश पाटील पुढे म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्राचे आव्हान वाढले असले तरीही प्रिंट  माध्यमाचे महत्व आजही टिकून आहे. लेखणी ही  बंदुकीहून अधिक शक्तीशाली आहे याचा प्रत्यय अनेक घटनांमधून येते. वृत्तांकनात तुम्ही लिहीत असलेल्या  शब्दांचा  समाजावर  परिणाम  होतो.  त्यामुळे तुमची जबाबदारी मोठी आहे.  कोणत्याही बातमीत दूरदूष्टी असेल तर ती बातमी आजही परिणामकारक असते. सध्या  समाजात सकारात्मकता गरजेची असल्याने तुमच्या कार्यातून ती समाजात रुजवा. पत्रकारितेची मुल्ये समाजात रुजवण्याचे ध्येय ठेवा. स्वत:ची क्षमता आणि क्षेत्राने दिलेली संधी त्याची जबाबदारी घेत कार्याचा सदुपयोग करा हीच समाजसेवा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, समाजात होत असलेल्या दुरावस्थेबाबत लढा देताना तुम्ही पत्रकार म्हणून सतत कार्यरत असता. तलवारीच्या धारेपेक्षा अनेकदा तुमची लेखणी हे शस्त्र सरस ठरते. हे सांगत त्यांनी स्वरचित कविता, गझल पेश करुन कार्यक्रमाची रंगत वृद्धींगत केली. शहरातील सुरक्षिततेबाबत ते म्हणाले की, आपल्या आजूबाजूला काय घडते याबाबत नागरिकांनी सतर्क राहायला हवे. अप्रिय घटना घडत असतील तर त्याची माहिती पोलीसांपर्यंत पोहोचवा.

संपादक अविनाश  चिलेकर पत्रकारांच्या वतीने निवेदन व्यक्त करताना म्हणाले की, शहरातील  प्रत्येक पत्रकार पेशा म्हणून पत्रकारिता करत आहे. निरपेक्षपणे शहरासाठी योगदान देतोय. पत्रकारांनी केलेली टीका राजकारण्यांनी सकारात्मक घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात पीसीबी न्यूजचे संपादक अविनाश चिलेकर, महाराष्ट्र टाइम्सचे सुनिल लांडगे, एमपीसी न्यूजचे सहयोगी संपादक अनिल कातळे, इंडियन एक्सप्रेसचे मनोज मोरे, प्रभातचे संदीप घिसे, सकाळचे पितांबर लोहार,लोकमतचे विश्वास मोरे, पुढारीच्या वर्षा कांबळे, पुण्यनगरीचे अमोल काकडे,  झी 24 तास चे कैलास पुरी, टीव्ही 9  चे रणजित जाधव,साम टिव्हीचे गोपाळ मोटघरे,लोकमतचे फोटोग्राफर अतुल मारवाडी, महाराष्ट्र टाइम्सचे फोटोग्राफर सचिन फुलसुंदर,सामनाचे नरेश नातू, लोकशक्तीचे विकास शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक प्रशांत शितोळे, प्रभाकर पवार यांनी केले. सुत्रसंचालन अमृता ओंबळे यांनी केले. ऋतुजा दिवेकर, साक्षी धादमे, पवन परब, बाळकृष्ण पवार, यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.