Pune News : चंद्रकांत पाटील यांची जीभ पुन्हा घसरली, शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाण्यावर आले आहेत. सांगलीत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानं चंद्रकांत पाटलांवर आता चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं पण तो कधी 60 च्या वर गेला नाही’ असं भाष्य करत चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर टीका केली.

याच कार्यक्रमात पुढे बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. सांगलीतील नेत्यांना वाटत होतं की आमच्या शिवाय पर्याय नाही पण भाजपा कार्यकर्त्यांनी तिथं यश मिळवून दाखवलं. त्या नेत्याचं नाव मी घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरू आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही असंही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.