Pimpri : तडीपार केलेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या सराईत आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरीमधील शास्त्रीनगर येथे करण्यात आली.

भूपेंद्र उर्फ सनी चरणजितसिंग गिल (वय 33, रा. राजीव गांधी नगर, पिंपरी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपेंद्र याला 17 डिसेंबर 2016 रोजी पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्याच्या तडीपारीचा कालावधी अद्याप संपला नाही. दरम्यान मंगळवारी (दि. 2) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शास्त्रीनगरमधील सुदर्शन बुक स्टॉलच्या बाजूला भूपेंद्र आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक लोखंडी कोयता मिळून आला. त्यावरून त्याच्याविरोधात मुंबई पोलीस अधिनियम कलम 142,  37 (1) आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.