Chikhali Crime : चिखली येथे कोयत्याने मारहाण करणाऱ्यास व दहशत माजवणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज : चिखली येथे कोयत्याने मारहाण (Chikhali Crime) करणाऱ्यास व दहशत माजवणाऱ्यास अटक करण्यात आले आहे. याबाबत चंद्रकांत माने (वय 40 वर्षे, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी आरोपी किरण साळवे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याला अटक करण्यात आले आहे. शुभम काळभोर व अमोल दराडे (दोघांचे पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) हे दोघे सुद्धा या प्रकरणात आरोपी आहेत. या सर्वांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात भादवि कलम 307, 504, 506, 34 आर्म ॲक्ट 4(25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना आरोपींनी घरात घुसून त्यांना धक्का दिला. आरोपी किरण साळवे यांच्यासोबत सुमारे वीस दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या मुलावर चिडून शिवीगाळ केली. आरोपी साळवीने त्याच्या पॅन्टमध्ये लपवलेला कोयता काढून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर मारला. परंतु, फिर्यादी खाली वाकल्याने तो वार हुकला.

आरोपी साळवीच्या हातातील कडे फिर्यादीच्या डोक्याला लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यानंतर जोराचा आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक जमा झाले. त्यावेळी आरोपी काळभोरने त्याच्या हातातील कोयता लोकांकडे दाखवून म्हणाला की, “तुम्ही मला ओळखत नाही का? मी तुमचा भाई आहे.” असे बोलून हवेमध्ये कोयता फिरवत असल्याने जमलेल्या लोकांनी घाबरून घरामध्ये जाऊन दारे खिडक्या बंद केल्या. त्या तिघांचे लक्ष बाहेर जमलेल्या लोकांकडे असल्याचा संधीचा फायदा घेऊन फिर्यादीने आरोपी यांना धक्का देऊन तेथील घराबाहेर पळून गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.