Chikhali : ‘आम्ही या भागातले भाई आहोत’ असे म्हणत चौघांकडून दोघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – ‘आम्ही या भागातले भाई आहोत, आमचा नाद करायचा नाही. जर आमच्या विरुद्ध पोलिसात गेले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 14) रात्री पावणेबाराच्या सुमारास स्पाईन रोडवर चिखली येथे घडली.

आकाश दशरथ खरात (वय 20, रा. चिखली), किरण साळवे अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश यांनी चिखली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 16) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश शिनगारे, दिनेश कोळी, रोहित जुजगर, दिनेश खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री फिर्यादी आकाश आणि त्यांचा मित्र किरण हे दोघेजण कारमधून जात होते. चिखली येथील स्पाईन रोडवर भीमशक्ती नगर येथे किरण याच्या ओळखीचे आरोपी दिसल्याने त्याने कार थांबवली. दोघेजण आरोपींजवळ गेले. आकाश आणि किरण यांनी काही बोलण्याच्या आधी आरोपींनी मारण्यास सुरुवात केली. आरोपींनी केलेल्या बेदम मारहाणीत आकाश यांचा एक हात निकामी झाली.

त्यानंतर आरोपींनी ‘आम्ही या भागातले भाई आहोत, आमचा नाद करायचा नाही. जर आमच्या विरुद्ध पोलिसात गेले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.