Chikhali News: जनावरांच्या गोठ्यात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा

एमपीसी न्यूज – नेवाळे वस्ती, चिखली येथे जनावरांच्या बंदिस्त गोठ्यात सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये 38 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 2) दुपारी करण्यात आली.

पोलीस शिपाई अतुल लोखंडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जुगार चालक मालक स्वप्निल सुदाम मळेकर (वय 30), जुगार खेळी किरण विष्णु नेवाळे (वय 40), विजय नामदेव नेवाळे (वय 50), सतिश बाजीराव नेवाळे (वय 28), अजय अनिल बिडकर (वय 30), किशोर भानुदास कदम (वय 29), सागर अशोक पाटील (वय 30, सर्व रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे वस्ती येथे स्वप्नील मळेकर याच्या जनावरांच्या गोठ्यात काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोठ्यात बुधवारी (दि. 2) दुपारी छापा मारून कारवाई केली. सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते 100 रुपये प्रमाणे तीन पत्ती जुगार खेळत होते. स्वप्नील मळेकर याने त्याचा गोठा जुगार खेळण्यासाठी उपलब्ध करून दिला. सात जणांकडून 38 हजार 60 रुपये रोख रक्कम आणि 40 रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण 38 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.