Chinchwad : ‘चंद्रिका’ गायीचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – शिवतेजनगर चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठाण आणि श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वामी समर्थ मंदिरात गायीचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. घरातील सदस्याचा वाढदिवस असल्याप्रमाणे सर्वांनी हिरीरीने भाग घेऊन सजावट केली. केक कापून औक्षण करून गोमातेचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये कपिला नावाची एक गाई आहे. त्या गाईला मागील वर्षी 12 ऑगस्ट 2018 रोजी एक कालवड झाली. कालवडीचा जन्म झाल्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर प्रतिष्ठान आणि महिला मंडळाने मिळून त्या कालवाडीचा नामकरण सोहळा आयोजित केला. कालवाडीचे साग्रसंगीत बारशाचा कार्यक्रम घालून तिचे ‘चंद्रिका’ हे नाव ठेवण्यात आले. चंद्रिका लहानपणापासून सर्वांच्या मायेने वाढली.

  • सोमवारी (दि. 12 ऑगस्ट 2019) तिचा पहिला वाढदिवस आला. चंद्रिकाचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्याची संकल्पना प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी मांडली. ही अनोखी संकल्पना सर्वांना आवडली. त्यानंतर सर्वांनी वाढदिवसाची तयारी केली. कुणी बॅनर बनवले, कुणी फुगे आणले तर कुणी स्वच्छता आणि इतर कामे केली. सायंकाळी चंद्रिकाचे औक्षण झाले. चंद्रिकाच्या वाढदिवसासाठी चक्क केक सुद्धा आणला. केक कापून चंद्रिकाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.

बस, ट्रेन, गाडी यांचा वाढदिवस आजवर बघितला होता. मात्र, गाईचा वाढदिवस सुद्धा साजरा झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गाय ही मानवाला अतिशय उपयोगी पडणारा प्राणी आहे. गाईचे दूध, शेण, गोमूत्र या सगळ्या गोष्टी माणसासाठी उपयोगी ठरतात. कुठल्याही अपेक्षेशिवाय गाय माणसाच्या मदतीला येते. तिचे हे ऋण फेडणे आपले कर्त्यव्य आहे. त्यामुळे तिचा वाढदिवस तसेच तिच्यासोबत काही आनंदाचे क्षण साजरे करायला हवेत.

  • ‘चंद्रिका’च्या वाढदिवसासाठी श्री स्वामी सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, राजू गुणवंत, संतोष शेळके, मंगेश पाटील, अर्चना तोडकर, सारिका रिकामे, प्रीती झोपे, अंजली देव, नीलिमा भंगाळे, निवृत्ती धाबेकर गुरुजी आदी उपस्थित होते. राजाराम सावंत यांनी वाढदीवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.