Chinchwad News: ‘भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आणि गुरुवारी (29 आणि 30 डिसेंबर) ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमाला आणि ‘भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन’ या विषयावरील कार्यशाळेचे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे.

याचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत माहिती दिली.

चापेकर समितीचे कार्यवाह अॅड. सतीश गोरडे आणि कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी उपस्थित होते. गिरीश प्रभुणे यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे (आयसीसीआर) अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

“भारतीय संस्कृतीचा उगम कधी आणि कसा झाला, भारतीयांचे मूळ भारतात आहे की भारताबाहेर याविषयीचे वास्तव समोर आणणारे वैज्ञानिक पुरावे गेल्या काही वर्षांत जगासमोर आले. डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ वसंत शिंदे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय गटाने राखीगढी या हरियाणातील पुरास्थळाचे उत्खनन करून तिथे सापडलेल्या मानवी सांगाड्यांचे डीएनए विश्लेषण केले. त्या विश्लेषणातून समोर आलेल्या माहितीनुसार राखीगढी येथे राहणारी माणसे आणि आजचे भारतीय यांच्या डीएनएमध्ये समानता असून, राखीगढी आणि आजचे भारतीय या दोघांचेही मूळ प्राचीन काळापासून भारतातच आहे. यापूर्वी सापडलेल्या पुरातत्वशास्त्रीय पुराव्यांना आता डीएनए अभ्यासाची जोड मिळाल्याने भारतीयांचे मूळ भारताबाहेर असल्याचा सिद्धांत आता कालबाह्य झाला असल्याचे वैज्ञानिक जगताने मान्य केले. डॉ. वसंत शिंदे या संपूर्ण संशोधनाविषयी, तसेच प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी दोन भागांतील जाहीर व्याख्यानांतून 29 आणि 30 डिसेंबर रोजी सचित्र सादरीकरण करतील.”

“जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी अनेक स्थळे, रचना, कलाकृती, लिखित- मौखिक साहित्य, पारंपरिक कौशल्ये देशाच्या विविध भागांमध्ये पाहायला मिळतात. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सर्व घटकांविषयीच्या शास्त्रीय नोंदी लोकसहभागातून जमा करून त्यांची सद्यःस्थिती नोंदविणारा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठीची ही पहिली कार्यशाळा होत आहे. यात डॉ. प्रमोद दंडवते, डॉ. श्रीकांत गणवीर, गिरीश प्रभुणे, प्रदीप रावत, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अरुणचंद्र पाठक, रमेश पडवळ आणि मयुरेश प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत. त्याच प्रमाणे दोन्ही दिवस पारंपरिक कला आणि कौशल्यांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी सहभागींना मिळणार आहे”, असे गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.

या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि वारसाप्रेमी यांनी नोंदणी केली आहे. डॉ. वसंत शिंदे यांची जाहीर व्याख्याने, तसेच कार्यशाळेतील काही व्याख्याने सोशल मीडियावर फेसबुक लाइव्हव्दारे ऑनलाइनही प्रसारित करण्यात येतील,” असे प्रभुणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.