Chinchwad News: तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार महिला पोलीस अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई  करा; अन्यथा…

एमपीसी न्यूज – रहाटणी येथील श्रद्धा कोकणे या तरुणीच्या आत्महत्येस महिला सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे या जबाबदार असून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा तसेच कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वुमेन हेल्पलाईन फाऊंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष नीता परदेशी बैस यांनी केली आहे. 
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना वुमेन हेल्पलाईनच्या वतीने यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले आहे. एपीआय देवतळे यांच्यावर 10 दिवसांत कारवाई न केल्यास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

रहाटणी येथे 26 एप्रिल 2021 ला श्रद्धा ज्ञानेश्वर कोकणे या तरुणीने आत्महत्या केली. लग्नाला तयार होत नसल्याने आरोपी अजिंक्य साठे याने सोशल मीडियावर फोटो टाकून श्रद्धाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अजिंक्य व त्याच्या कुटुंबीयांकडून त्रास होत असल्याबद्दल फिर्याद देण्यासाठी श्रद्धा वाकड पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांनी तक्रार दाखल करून घेण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप श्रद्धाच्या भावाने केला आहे. देवतळे यांनी वेळीच तक्रार दाखल न केल्यामुळे श्रद्धावर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यामुळे त्या देखील इतर आरोपींप्रमाणेच श्रद्धाच्या आत्महत्येस जबाबदार आहेत, असा आरोप नीता परदेशी यांनी केला आहे.
या प्रकरणास 11 महिने होऊनही देवतळे यांच्यावर केवळ बदली व्यतिरिक्त कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शहरातील महिलांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. एका महिला फिर्यादीशी अत्यंत बेजबाबदारपणे वागून देवतळे या महिला पोलीस अधिकाऱ्याने असंवेदनशीलता दाखविणे, ही बाब संतापजनक आहे, असे वुमेन हेल्पलाईन फाऊंडेशनने म्हटले आहे.
या संदर्भात पोलीस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला असता, वुमेन हेल्पलाईन फाऊंडेशनने एपीआय सपना देवतळे यांच्याविरोधात तक्रार केल्याच्या माहितीस दुजोरा देण्यात आला. ही तक्रार येण्यापूर्वीच देवतळे यांची चौकशी सुरू करण्यात आली असून त्या चौकशीचा अहवाल पोलीस आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.