Chinchwad News : शहरात चोरटे सुसाट; चोरीच्या आणखी दहा घटनांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे चोरटे पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहने, दागिने, वाहनांचे भाग चोरून नेत आहेत. घरफोड्या, दरोडे आणि दागिन्यांची जबरदस्तीने चोरीही करीत आहेत. शहराच्या विविध भागात चोरीच्या आणखी दहा घटना उघडकीस आल्या आहेत. यात चोरट्यांनी सात लाख 61 हजार 400 रुपयांचा माल चोरून नेला आहे.

आळंदी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आळंदी येथे एका महिलेच्या गळ्यातील 73 हजार 500 रुपये किमतीचे मिनी गंठण चोरट्यांनी चोरून नेले. तर मोशी प्राधिकरण येथे एका महिलेच्या गळ्यातील 50 हजारांचे मिनी गंठण हिसकावून नेले.

एमआयडीसी भोसरी, सांगवी आणि चाकण पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी भोसरी मधून 80 हजारांची, सांगवीमधून 25 हजारांची तर चाकण मधून 40 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 10 हजारांची सायकल चोरट्यांनी चोरून नेली आहे.

निगडी ते चिंचवड या मार्गावरून पीएमपी बसमधून प्रवास करणा-या एका तरुणाच्या गळ्यातील 40 हजारांची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने तरुणाच्या नकळत चोरून नेली. देहूरोड येथे मुलांच्या खाजगी हॉस्टेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. एका तरुणाच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल फोन, इअर पॉट्स, कॅल्क्युलेटर असा एकूण 66 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मोरया गोसावी मंदिराच्या जवळ असलेल्या दशक्रिया विधी घाटाजवळ पार्क केलेल्या एका कारमधून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, चेकबुक, पासबुक, कागदपत्र असा एकूण 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी येथील एका बांधकाम साईटवरील गोडाऊन मधून चार चोरट्यांनी तीन लाख 23 हजार 900 रुपयांची इलेक्ट्रिक वायर, केबल चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.