Chinchwad: आजपर्यंत ‘कोरोनामुक्त’ असलेल्या चिंचवड भागात पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज – आजपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ‘ब’ प्रभागातील चिंचवडमध्ये पुण्यातून आलेल्या एका नागरिकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या चिंचवड परिसरातील नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह रुग्णावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या नातेवाईकांना क्वारंनटाईन केले आहे.

चिंचवड परिसरातील माणिक काॅलनी येथील नातेवाईकांकडे पुण्यावरून एकजण आले होते. पुणे येथील गंजपेठेत वास्तव्यास असलेले नागरिक चिंचवड परिसरात आले होते. त्यांना एका रुग्णालयात ऍडमिट केले होते. जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते.

त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. रावेत, किवळे, मामुर्डी, चिंचवडचा परिसर येत असलेल्या ‘ब’ प्रभाग अद्यापपर्यंत कोरोनामुक्त होता.

दरम्यान, यांचे एक नातेवाईक पिंपरी, नेहरूनगर परिसरात वास्तव्यास आहेत. ते नेहरूनगर परिसरातही गेले होते. त्यामुळे नेहरूनगर परिसरात पण भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.