Theatre Reopens : 22 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू होणार, ‘असे’ आहेत नियम

एमपीसी न्यूज – येत्या 22 ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

राज्यातील कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

  • सिनेमागृहे आणि मल्टीप्लेक्समध्ये 50 टक्के प्रेक्षकांची आसनक्षमता असेल. याचाच अर्थ दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवण्यात यावे.
  •  ज्या ठिकाणी प्रेक्षक बसणार नाहीत त्या खुर्चीवर क्रॉस मार्किंग करणे आवश्यक आहे. ऑनलाईन तिकिट काढताना आणि तिकीट खिडकीवर तिकीट काढताना ज्या खुर्च्या बसू नये असे मार्किंग करण्यात आले आहे ते नमूद करणे आवश्यक आहे.
  • सिनेमागृहांतील पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा आणि सिनेमागृहांतील लिफ्टमध्येसुद्धा गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समधील सिनेमांची वेळ वेगवेगळ्या ठेवल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यावे.
  • तिकीट खिडकीवर गर्दी होऊ नये यासाठी डिजिटल पद्धतीने तिकीट बुकींगवर भर देण्यात यावा. तसेच सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये तिकीट काढताना तिकीट खिडकीवर गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक तितक्या तिकीट खिडक्या उघडण्यात याव्यात.
  • मल्टीप्लेक्समध्ये सुद्धा प्लोअर मॅनेजमेंट करुन गर्दी टाळण्यात यावी.
  • चित्रपटगृहांमध्ये संपूर्ण जागेचे सॅनिटाईझेशन करण्यात यावे. सिनेमागृहांमधील प्रत्येक स्क्रिनिंग नंतर सॅनिटायझेशन करण्यात यावे. खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, कर्मचाऱ्यांचे बसण्याचे ठिकाण, स्वच्छतागृहे यांची साफसफाई नियमितपणे करण्यात यावी.
  • सॅनिटायझेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट देणे, बुट्स, ग्लोव्ह्ज, मास्क देण्यात यावे. कोविडचा संसर्गाचा एक तरी व्यक्ती आढळल्यास त्या जागेचे निर्जंतुकीकरण तात्काळ करण्यात यावे.
  • सिनेमागृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. सिनेमागृहांमध्ये काम करणारे ज्येष्ठ कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांनीही आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक असून या कर्मचाऱ्यांचे दोन डोसचे लसीकरण होऊन 14 दिवसांपेक्षा जास्त कालावधी असणे आवश्यक आहे.
  • सिनेमागृहांमध्ये मोक्याच्या ठिकाणी काय करावे आणि काय करु नये याची माहिती थोडक्यात नमूद करणारे बोर्ड लावणे आवश्यक आहे. हे बोर्ड स्वच्छतागृहे, तिकीट खिडकीजवळ, सिनेमागृहांमध्ये आत येताना, खाद्यपदार्थांच्या स्टॉलजवळ असे लावणे आवश्यक आहे.
  • सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना नियमांची माहिती करुन देण्यासाठी माहिती देणारा ऑडिओ संदेश देण्यात यावा. याशिवाय ठिकठिकाणी पोस्टर्स, स्टॅण्डीज यांची उभारणी करण्यात यावी.
  • सिनेमागृहांमधील एअर कंडिशन, व्हेंटीलेशन हे ठरवून दिलेल्या मार्गदर्शक नियमांनुसार असणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील एअर कंडिशन 24 ते 30 सेल्सिअस तापमान इतका असावा. ह्युमिडीटीची रेंज 40 ते 70 टक्के असावी.
  • सिनेमागृहांमध्ये हवा येईल तसेच क्रॉस व्हेंटिलेशन होईल हे पाहण्यात यावे. तसेच एक्झॉस्ट फॅन्सची सोय असावी.
  • सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना पॅक्ड फुड आणि पॅक्ड पेय उपलब्ध होतील. सिनेमागृहांमध्ये सिनेमा सुरु असताना खाद्यपदार्थ नेण्यास बंदी असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.