Pune Crime News : पुणे हादरले! कोयत्याने सपासप वार करून कबड्डीपटू 14 वर्षीय मुलीचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – कबड्डीचा सराव करण्यासाठी मैदानावर गेलेल्या एका चौदा वर्षीय तरुणीचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका मैदानावर सायंकाळी हा प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळी कोयता आणि इतर शस्त्र टाकून पसार झाले आहेत. बिबवेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, क्षितिजा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ती उत्कृष्ट कबड्डीपटू होती. आज सायंकाळी ती नेहमीप्रमाणे मित्र-मैत्रिणींसोबत कबड्डी खेळण्यासाठी आली होती. यावेळी त्या ठिकाणी काही तरुण आले. त्यातील एकाने क्षितिजाला बाजूला घेऊन तिच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

अचानक त्यांच्यात कशावरून तरी वाद झाले. त्यानंतर आरोपीने सोबत आणलेला कोयता काढला आणि सपासप तिच्या मानेवर वार केले. काही कळण्याच्या आतच क्षितिजा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. त्यानंतर आरोपींनी सोबत आणली शस्त्र त्या ठिकाणी सोडून देत पळ काढला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बिबवेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पडलेला कोयता आणि इतर शस्त्र त्यांनी जप्त केली आहे. आरोपींचा शोध घेण्यास पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.