Nigdi News : प्राधिकरणातील विशेष नियोजन कार्यालयाच्या स्थलांतरणामुळे नागरिकांची होतेय गैरसोय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विशेष नियोजन प्राधिकरण कार्यालयाचे नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता चिखली येथे स्थलांतरण केले. लोकप्रतिनीधींनाही विश्वासात घेतले नाही. महापालिकेने एकतर्फी कार्यालयाचे स्थलांतरण केले. नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कार्यालयातील कर्मचारी उद्धटपणे बोलतात. समस्यांचे निराकरण होत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देऊन तेथील परिस्थिती सुधारावा अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर, अॅड. श्रीपाद कुलकर्णी यांनी केली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जावळकर, अॅड. कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणा मधील कार्यालय हे राजे शिवाजीनगर चिखली सेक्टर क्रमांक 16 येथे स्थलांतरित केले आहे. या कार्यालयाचे स्थलांतर करण्याआधी कोणतीही पूर्व सूचना महापालिकेने दिलेली नव्हती. कार्यालय स्थलांतरित करताना स्थानिक लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतले नाही. महापालिकेने स्थलांतर हे एकतर्फी केले आहे. हे कार्यालय ह प्राधिकरणामध्ये असताना सर्व नागरिकांची चांगली सोय होती. परंतु, अचानक हे कार्यालय स्थलांतरित झाल्याने सर्व नागरिकांची तसेच ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय होत आहे.

कार्यालयामधील फॉर्म वाटप व स्वीकृती करण्याची वेळ देखील गैरसोयीची आहे. कार्यालयामधील काही कर्मचा-यांची वागणूक उद्घट व आडमुठेपणाची आहे. काही कर्मचारी नियोजित वेळेवर बोट दाखवून कामाची चालढकल करतात. तसेच येणाऱ्या प्रत्येक नागिरकांना सतत काही तरी क्षुल्लक त्रुटी काढून सतत हेलपाटे घालायला लावतात. कारणे विचारली तर आमच्या कार्यालयाचे हेच नियम आहेत असे सांगतात.

या कार्यालयामध्ये काही एक काम प्रलंबित नाही असे सांगतात. परंतु, वारस नोंद नाव समाविष्ट करण्यासह अनेक कामे आजरोजी प्रलंबित आहेत. या कर्मचा-यांवर देखरेख करण्यासाठी कोणी वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नाही. अशा सर्व गोंधळामध्ये या कार्यालायचे कामकाज चालू आहे. कार्यालयाचे स्थलांतर करून काय साध्य झाले याचा कोणताही उलगडा होत नाही. नागरिकांच्या प्रश्नांचे त्वरित निराकरण होणे गरजेचे आहे. अन्यथा एकही कामे मार्गी लागणार नाही. महापलिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देऊन परिस्थितीत सुधारणा करावी, अशी मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.