Corona Vaccine: मोठी बातमी ! ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी थांबवली

लसीचे दुष्परिणाम दिसू लागल्यानंतर रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात जावं लागलं. त्याच्या शरीरावर नेमका काय दुष्परिणाम झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

एमपीसी न्यूज – ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटिश-स्वीडिश कंपनी एस्ट्राजेनिकाची संपूर्ण जगासाठी आशेचा किरण बनलेली AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तिला ही लस टोचल्यानंतर त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं. त्यानंतर या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे.

दरम्यान, लसीचे दुष्परिणाम दिसू लागल्यानंतर रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात जावं लागलं. त्याच्या शरीरावर नेमका काय दुष्परिणाम झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र हा रुग्ण लवकरच बरा होईल, अशा विश्वास या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने व्यक्त केला.

लस बनवण्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनिका आघाडीवर होते. पण चाचणी थांबवल्यामुळे लस तयार करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे.

एस्ट्राजेनिकाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सामान्य प्रक्रिया आहे. आता रुग्णाच्या आजाराच्या कारणांचा शोध घेतला जाईल जेणेकरुन चाचणीची विश्वासार्हता कायम राहिल. मोठ्या प्रमाणावर चाचणी होत असल्यास स्वयंसेवक आजारी पडण्याची शक्यता असते. पण याचा स्वतंत्ररित्या सतर्कतेने तपास होणं गरजेचं आहे. आम्ही याचा शोध घेत आहोत, जेणेकरुन चाचणीच्या मुदतीवर याचा परिणाम होऊ नये.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक 2021 च्या सुरुवातीच्या महिन्यात ही लस बाजारात येईल असे मागील आठवड्यात म्हणाले होते. भारतासह जगभरात या लसीसाठी मोठी मागणी होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.