Sangvi : नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू चोरून नेणा-या तिघांवर गुन्हा; एकाला अटक

0

एमपीसी न्यूज – एसटीपी औंध जवळ राम नदी व मुळा नदीच्या संगम पात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून चोरून नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यातील एकाला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) रात्री पावणे बारा ते शनिवारी (दि. 21) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला.

पर्यावरण व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली जयंत पाटकर (वय 47, रा. औंध) यांनी याबाबत शनिवारी (दि. 21) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजयकुमार छक्कम साव (वय 22, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर. मूळ रा. झारखंड) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विजयकुमार याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीपी औंधच्या मधील बाजूला राम नदी आणि मुळा नदीचा संगम आहे. त्या संगम पात्रात आरोपींनी पोकलँड मशीनच्या साहाय्याने वाळू उपसा केली. आठ हजार रुपये किमतीची वाळू ट्रॅक्टरमध्ये भरून चोरून नेताना हा प्रकार फिर्यादी यांच्या निदर्शनास आला. नदी पात्रातील वाळू उपसा केल्यामुळे नदीपात्रात खड्डे पडले आहे. याबाबत पर्यावरण व सामाजिक कार्यकर्त्या पाटकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

भारतीय दंड विधान कलम 379, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 9, 15 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III