Pune News : शहरातील बोटॅनिका, मॅश, रुफटाॅप व्हिलेज, जश्न सुफीज, सायक्लाॅन या नामांकित हॉटेल्स बारवर गुन्हे शाखेची कारवाई 

एमपीसी न्यूज : पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का सेवा देणाऱ्या बड्या हाॅटेल्स, बारवर पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच बाहेरील वस्तीतील (out skirts)  हाॅटेल्स, बार मध्ये पहाटेपर्यंत तरुणाईच्या सुरू असलेल्या हुक्का पार्ट्यां व त्यामुळे उद्भवणारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.

करोनानंतर सुरु झालेल्या न्यू नाॅर्मल लाईफस्टाईल मध्ये पुण्यातील तरुणाईमध्ये रात्री उशिरापर्यंत हाॅटेलींग करणे तसेच  हुक्का पार्टीचे प्रमाण अधिकतेने वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर योग्य नियंत्रण आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

रात्री उशिरापर्यंत व विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्या हाॅटेल्स, बारना प्रथम वेळेत बंद करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. तथापी त्यानंतरही आस्थापना विहीत वेळेत बंद होत नसल्याने त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. या विशेष अभियानांतर्गत गेल्या आठवड्यापासून सामाजिक सुरक्षा विभागामार्फत वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील साळुंखे विहार रोडवरील ‘सूफी’ व ‘जश्न’ तसेच मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील ‘हाऊस ऑफ मेडिसी’, येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ‘युनिकाॅर्न ॲंड एलरो’ या हाॅटेल्स बार आस्थापनांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हाॅटेल्स, बारवर तसेच हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागास नुकतेच पुणे पोलीस दलात हजर झालेले दहा परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ विरोधी सेलचे अधिकारी व स्टाफही देण्यात आले होते.

या संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मोहीमे अंतर्गत शनिवारी रात्री व रविवारी पहाटेच्या दरम्यान पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील बंडगार्डन पो. स्टे. हद्दीतील ‘बोटॅनिका’, कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील ‘मॅश’ आणि  ‘रुफटाॅप व्हिलेज’, वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील ‘जश्न’ आणि ‘सुफीज’, सहकार नगर पोलीस स्टेशन हद्दीतील ‘सायक्लाॅन’ अशा विविध हाॅटेल्स बार आस्थापनाविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत सदरची विशेष मोहीम राबवित असता धनकवडी येथील  सरस्वती कॉम्प्लेक्स मधील ‘कॅफे सायक्लोन’ मध्ये पहाटे  ०२.२० वा. च्या  सुमारास अवैध रित्या हुक्का बार चालू असल्याचे समजलेने सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा कारवाई करण्यात आली असता, घटनास्थळावर ११ हुक्कापॉट्स, चिलीम  व वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ व इतर साहित्य असे एकुण रु. ४७,५००/- चा मुद्देमाल मिळून आलेने तो कायदेशीररीत्या  जप्त करून ‘कॅफे सायक्लाॅन’ बार व हुक्का पार्लरचे मालक १) केतन किसन तापकीर, वय २६ वर्षे, रा. सदर, २) कुणाल किसन तापकीर वय २९ वर्षे, रा. सदर, ३) बार व्यवस्थापक नामे अभिषेक दत्तात्रय जगताप, वय २२ वर्षे, रा. सदर, तसेच हुक्का सर्व्हिस करणारे ४  इसम  यांचे  विरुद्ध  सहकार नगर पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. ९४/२२,  कलम ४ (अ ),  २१ (अ ) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. सदर आस्थापनेविरूद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ क्ष अन्वये देखील कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.