Pimpri News : मनाई असताना महापालिका प्रवेशद्वारासमोर नागरिकांची गर्दी

सुरक्षित अंतराचा फज्जा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत असल्याने नागरिक, ठेकेदारांना महापालिका प्रवेशास मनाई केली आहे. असे असतानाही महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आज (सोमवारी) नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला होता. यातून एखाद्याला कोरोनाची लागण झाली. तर, त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन महिन्यांपासून झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिवसाला तीन हजारहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक, ठेकेदार यांना महापालिका मुख्यालय, विविध विभागीय कार्यालयात प्रवेशास मनाई केली आहे.

 नागरिकांनी ई-मेलद्वारे त्या-त्या विभागाकडे आपल्या तक्रारी कराव्यात, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. असे असताना आज (सोमवारी) महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला होता. काही जणांनी सुरक्षा रक्षकासोबत हुज्जत घातली.

दरम्यान, महापालिका वैद्यकीय विभागात मानधनावर विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जात आहे. त्यासाठी विद्यार्थींही महापालिकेत आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.