Dehugaoan News : टाळ-मृदंगाच्या गजरात तुकोबांच्या पादुकांचे प्रस्थान

एमपीसीन्यूज : जागतिक महामारी कोरोना 19 च्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 336 व्या पालखीचे प्रस्थान गुरूवारी (दि. 1) दुपारी अडीचच्या सुमारास मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत शासनाचे निर्बंधनाचे पालन करून खासदार संभाजीराजे भोसले छत्रपती यांच्या हस्ते पालखी प्रस्थान ठेवले.

वारकरी संप्रदायाच्या पायीवारीस परवानगी द्यावी या मागणीचा सुवर्ण मध्य काढत 35 दिवसांची पायी वारी रद्द करून प्रस्थान सोहळ्यास 100 वारकऱ्यांना परवानगी दिली व काल 30 जुन रोजी उशिरा प्रस्थान सोहळ्या नंतर 250 भाविकांनी दर्शनासाठी परवानगी दिली. वाखरी येथून दिड कलोमीटर अंतर पायी वारी करण्यास शासनाने परवानगी दिली होती.

मात्र, सुधारित आदेशानुसार सर्व पालख्यांचे मिळून 20 भाविकांसह साडेतीन किलोमीटरच्या पायी वारीला ही परवानगी सशर्त दिली. उर्वरित 380 भाविकांनी विशेष वाहनाने पंढरपूरमध्ये नेण्यात येणार आहे हा आदेशाना वारकऱ्यांमध्ये काही अंशी समाधान दिसून आले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थित भाविक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह सकाळपासून ओसांडून वाहत होता. मंदिराच्या परिसरात प्रसन्न वातावरणात उपस्थित वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले होते. पावसाळ्याला सुरवात झालेली असली तरी केवळ ढगाळ हवामान एवढेच काय ते समाधान होते. वैष्णवांचे दैवत असलेल्या पांडूरंगाच्या भेटीला भेटण्यासाठी तुतारी, टाळ मृदंगाच्या निनाद, विणा यांच्या तालावर उपस्थित वारकऱ्यांची अत्यंत मनोभावे उत्साही वातावरणात पाऊले टाकत होते.

या भाविकांना मंदिराच्या आवारात 1 वाजल्यापासून प्रवेश देण्यास सुरवात केली होती. जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान गुरूवारी दुपारी 2 वाजता खासदार संभाजीराजे भोसले, युवराज शहाजीराजे भोसले, मानाचे वारकरी वढू येथील हनुमंतराव शिवले या विणेकऱ्याच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे त्यांच्या पत्नी सविता बारणे व आमदार सुनिल शेळके यांच्या पत्नी सारीका शेळके आदी उपस्थित होते. या प्रस्थान सोहळ्याची विधीवत पूजा ग्रामोपाध्याय सुभाष टंकसाळे यांनी धरती, वायू, अग्नी, जल, आकाश यांच्यासह पाद्य पूजा व कलशपूजा केली. प्रथम श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली.

प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार गीता गायकवाड, हवेलीच्या तहसिलदार तृप्ती कोलते, नायब तहसिलदार प्रशांत ढमाले, आदी उपस्थित होते. दरम्यानच्या काळात वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर पाउले टाकण्यास सुरवात केली होती व भजन करत वारीतील विविध खेळ करीत आपली पाऊले टाकण्यात दंग झाले होते.

आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी खांद्यावर भगवी पताका तर केवळ काही महिला डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह ‘‘ज्ञानोबा- तुकाराम’’ हा जयघोष करीत या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. चोपदार नामदेव गिराम यांनी दंड उंचावताच आणि शिंगाड्याच्या आवाज होताच परिसरात उपस्थितांनी मृदंग, टाळ, विणा यांच्या निनाद केला. प्रथेप्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका उपस्थितांच्या हस्ते फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या.

महाराजांच्या पादुका पालखीत ठेवल्यानंतर सेवेकरी भोई तानाजी कळमकर, गुंडाप्पा कांबळे, बाळासाहेब चव्हाण, नामदेव भिंगारदिवे, अनिल गायकवाड, श्रीकृष्ण पवार यांच्यासह भाविकांनीही पालखीला खांदा दिला.

तुतारी(शिंगाडा) धारक पोपट तांबे यांनी तुतारी फुंकल्या बरोबर उपस्थित वारकऱ्यांनी एकच जल्लोश करीत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असा जयघोष करण्यास सुरवात केला. या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला याच वेळी बाळू पांडे व आश्विन पांडे यांनी चौघडाही वाजवित तर रियाझ मुलाणी यांनी ताशा वादन करीत वारीत रंग भरला.

पालखी भजनी मंडपातून बाहेर येताच सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकऱ्यांमध्ये अधिकच उत्साह भरला, त्यांच्या मुखातुन आपोआपच अभंगाचे बोल बाहेर पडू लागले.

वारकऱ्यांचे हातातील टाळ विना मृदंगाच्या तालावर भक्तीमय वातावरणात एक एक पाऊल पुढे पडत होते. मंदिर परिसर भक्तीमय झाले होते. चौघड्याचे मानकरी बाळू पांडे यांनी चौघडा वाजविण्यास सुरवात करताच पालखीवर सेवेकऱ्यांनी छत्र धरले, जरी पट्टा, गरूड टक्के, चांदीची अब्दागिरी व पताका घेत मंदिर प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून पालखी बाहेर पडली.

चोपदार नामदेव गिराम यांच्यासह उपस्थित सेवकऱ्यांनी आपआपल्या जबाबदाऱ्या घेत पालखी साध्यापद्दतीने भजनी मंडपातून 3.30 वाजण्याच्या सुमारास पालखी देऊळवाड्यातील मुख्य मंदिरासह शिळा मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.