Dehuroad Crime News : मासे विक्रीचा स्टॉल लावण्याच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – पोलिस रेकॉर्डवरील दोघांनी एका तरुणाला मासे विक्रीचा स्टॉल लावण्याच्या कारणावरून कोयता आणि सुरीने मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 4) सकाळी सात वाजता मुकाई चौक, किवळे येथे घडली. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अदनान फयाज शेख (वय 18, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजिंक्य तिखे (वय 28) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख मासेविक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते मुकाई चौक येथे मासे विक्रीचा टेंट लावत होते. त्यावेळी तिथे आरोपी आले.

‘तू येथे स्टॉल टाकायचा नाही’, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांच्या स्टॉलजवळ ठेवलेला मासे कापण्याचा कोयता आणि सुरीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये फिर्यादी यांच्या पोटावर, हातावर तसेच डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पोलिसांनी अजिंक्य तिखे याला अटक केली आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.