Dehuroad : दहा हजारांच्या खंडणीची मागणी करत पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – मार्केटमध्ये भाजी विकण्यासाठी भाजी विक्रेत्याकडे  महिन्याला दहा हजार रुपये देण्याची खंडणी मागितली. तसेच याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री आंबेडकर नगर, देहूरोड येथे घडली.

दीपक पांडे, सुशील पिल्ले, आकाश (पूर्ण नाव माहिती नाही. सर्व रा. देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तारीख वहिद रंगरेज (वय 34, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तारीख हे देहूरोड मधील गांधीनगर येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. ते रात्री देहूरोड येथून भाजीपाला घेऊन घरी आले. रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी तारीख यांच्या घरात आले. ‘तू गांधीनगर येथे भाजीपाला विकायचा नाही. गांधीनगर येथे भाजीपाला विकायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये द्यावे लागतील’ अशी धमकी देत खंडणीची मागणी केली.

याबाबत जर पोलिसात तक्रार दिली तर तुला आज रात्री येऊन मारून टाकीन अशी आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.