Dehuroad : उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारूच्या बाटल्यांवर अहमदनगरच्या कारखान्याचे बनावट लेबल

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी कार्यालयाने देहूरोड जवळील (Dehuroad) मामुर्डी येथे अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई केली. यामध्ये दारूच्या 60 हजार बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांवर अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे लेबल लावले होते. याची उत्पादन शुल्क विभागाने चौकशी केली असता ते लेबल देखील बनावट असल्याने उघडकीस आले आहे. त्यामुळे आता देहूरोड पोलीस ठाण्यात साखर कारखान्याची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झुल्फिकार ताज आली चौधरी (वय 68, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश), अमित ठाकूर आहेर (वय 30, रा. बोरमाळ पारसवाडा, ता. तलासरी, जि. पालघर), संजय भगोवती पांड्ये, असलम दौलत खान अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचे जनरल मॅनेजर कैलास सिताराम लहारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maval : मावळातील किल्ले लोहगडाचे जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी युनेस्कोकडे नामांकन

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुना पुणे-मुंबई महामार्गावर मामुर्डी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Dehuroad) पिंपरी कार्यालयाने 23 जानेवारी रोजी एक टेम्पो (डीडी 01/आर 9205) ताब्यात घेतला. त्यामध्ये बनावट देशी दारू रॉकेट संत्रा 90 मिली क्षमतेच्या 60 हजार बाटल्या आढळल्या. या बनावट मद्याची किंमत 21 लाख रुपये आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 21 लाखांचे मद्य 15 लाखांचे वाहन असा 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

त्यानंतर टेम्पो चालकाकडे चौकशी करत त्याने हा दारूसाठा गोवा राज्यातून आणला असल्याचे समोर आले. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने वडावल, ता. डीचोली, जि. उत्तर गोवा या ठिकाणी असलेल्या बनावट देशी मद्यनिर्मितीच्या कारखान्यावर छापा घालून कारवाई केली. त्यामध्ये देशी दारू तयार करण्यासाठी लागणारा एक लाख 34 हजार 895 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोघांना अटक करत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी पोलीस कोठडीत असताना उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्याकडे चौकशी केली. आरोपींच्या ताब्यात सापडलेल्या दारूच्या बाटल्यांवर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे लेबल लावले होते. त्याबाबत उत्पादन शुल्क विभागाने कारखान्याकडे चौकशी केली. त्यात कारखान्याने अशा प्रकारचे लेबल आरोपींना दिले नसून ते बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर कारखान्याकडून फिर्याद देत आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.