Maval : मावळातील किल्ले लोहगडाचे जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी युनेस्कोकडे नामांकन

एमपीसी न्यूज : छ. शिवाजी महाराजांच्या (Maval) राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त भारत सरकारतर्फे 2024.-2025 साठी युनेस्कोला 12 शिवकालीन गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या 12 किल्ल्यांच्या यादीत मावळ तालुक्यातील किल्ले लोहगडाचा देखील समावेश आहे. त्यामुळे मावळ तालुक्याच्या दृष्टीने ही खूप मोठी बाब मानली जात आहे.

वारसा स्थळाच्या नामांकनासाठी प्रस्तावात महाराष्ट्रातले 9 गिरीदुर्ग व 3 जलदुर्ग अशा बारा गडकोटांना नामांकन देण्यात आले आहे.शिवछत्रपतींचे जन्मस्थळ शिवनेरीसह, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, द्वितीय राजधानी रायगड सह साल्हेर,लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग,पन्हाळा,सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग त्याचबरोबर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यात समावेश करण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांनी केलेला पराक्रम, लष्करीदृष्ट्या केलेली गडकोटांची बांधणी याची दखल आता जागतिक स्तरावर घेतली जावी यासाठी केंद्राने एक पाऊल पुढे टाकले आहे.

हे नामांकन मावळ तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणजे लोहगड किल्ल्याचा समावेश या मानांकनात केला आहे. त्यामुळे लोहगडला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त होईल. लोहगड किल्ला व परिसराचा प्रचंड कायापालट होईल. जगभरातून पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येतील अभ्यास करण्यासाठी येतील. नवीन नवीन प्रकल्प या ठिकाणी येतील. मावळचे प्रमुख पर्यटन केंद्र लोहगड होईल. त्यामुळे स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल. व पर्यायाने या परिसराचा विकास होईल.

लोहगड चा इतिहास आपण पाहिला असता पुरंदरच्या तहामध्ये मोघलांकडे हा किल्ला गेला होता, सुरतची संपत्ती या ठिकाणी ठेवली होती, छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड, या गडावर नेताजी पालकर, कानोजी आंग्रे यांचे काही काळ वास्तव्य होते.

तसेच पेशवे काळात नाना फडणवीस यांची पण या किल्ल्यावर (Maval) वास्तव्यास होते. त्यांच्या काळात त्यांनी या गडाची काही डागडुजी केली होती. गडावर 16 कोन असलेला तलाव आहे, शिवमंदिर आहे, गडाला पाच दरवाजे आहे, विंचू कडामाची, जिथे सुरत ची संपत्ती ठेवली होती अशी लक्ष्मी कोठी, भक्कम बुरुज, तटबंदी, सुंदर अशा पायऱ्या, तसेच गड परिसरामध्ये समोर असलेले तुंग,तिकोना विसापूर हे किल्ले. तसे तिथून वाहनारी पवना नदी व पवना धरण. हे देखील गडाच्या वैभवात वाढ करते.

श्री शिवाजी रायगड मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचतर्फे सर्वप्रथम लोहगडला दुरुस्ती चालू झाली. गडावरील जीर्ण झालेले शिवमंदिर याचा सर्वप्रथम जीर्णोद्धार श्री शिवाजी रायगड मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंच आणी स्थानिक ग्रामस्थ यांच्या तर्फे करण्यात आला. येथूनच गडाची खरी भरभराटी चालू झाली.शंभू महादेव प्रसन्न झाले. महाशिवरात्री यात्रा चालू झाली.

गडाला नवीन गणेश दरवाजा बसला. पुरातत्व विभागाने तो बसविला. श्री शिवाजी रायगड मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचाने पुरातत्ववाकडे वेळोवेळी गडाच्या सुधारणांचा पाठपुरावा केला. पुरातत्व विभागाने चांगली साथ दिली. पुढे गडाला पायऱ्या, बुरुंज तडबंदी याची दुरुस्तीची काम चांगली चालू झाली. त्याचवेळी विसापूर वरील शिव मंदिर जीर्ण होऊन पडल्यानंतर त्याचाही पाठपुरावा मंचाने केला व विसापूर वरील शिवमंदिर पुरातत्व विभागाने बांधले. अशा रीतीने लोहगड विसापूरचा कायापालट होत आहे. म्हणजे गेली 25 वर्षे या ठिकाणी काम करत आहे. लोहगड विसापूरचा विकास हेच मंचाचे प्रमुख ध्येय असल्याचे मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी सांगितले.

त्याचबरोबर लोहगड पायथ्याला भव्य असे शिवस्मारक बांधले आहे. त्याच्याभोवती भव्य अशी शिवसृष्टी उभी करायची आहे. या ठिकाणी येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना शिवरायांचा पराक्रमी इतिहास पाहता आला पाहिजे. व तोच इतिहास त्यांच्याकडून जगभरात पोहोचला जाईल. त्यासाठी शासनाने या ठिकाणी भव्य अशा शिवसृष्टीला मोठी मदत केली पाहिजे. अशी मागणी संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली.

युनोस्को च्या जागतिक वारसा यादीत नामांकनासाठी लोहगडचा समावेश केल्याबद्दल संस्थापक सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार,अनिकेत आंबेकर, सचिन निंबाळकर,गणेश उंडे,चेतन जोशी,बसाप्पा भंडारी,अमोल गोरे आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.