Dehuroad : बनावट क्रेडिट कार्डद्वारे तरुणाची सव्वा लाखाची फसवणूक; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून क्रेडिट कार्ड तयार केले. त्याद्वारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार जून 2019 मध्ये देहूरोड येथे घडला. याबाबत सोमवारी (दि. 10 फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला आहे.

मनोज युवराज कोळी, योगेश लक्ष्मण पानकर (दोघे रा. देहूगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लखन धनराज मदने (वय 30, रा. देहूगाव. मूळ रा. दस्तापूर, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज याने फिर्यादी लखन यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून बनावट क्रेडिट कार्ड तयार केले. ते आरोपी योगेश याच्या पत्त्यावर कुरिअरद्वारे पाठवले. योगेश याने क्रेडिट कार्ड घेऊन त्याचा वापर केला. क्रेडिट कार्डवरून आरोपीने त्याच्या पेटीएम खात्यात एक लाख रुपये ट्रान्स्फर केले. दोघांनी मिळून लखन यांची एकूण एक लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.