Dehuroad News: खोटी विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणाऱ्या स्वयंघोषित पास्टरवर कारवाई करा : श्रीजीत रमेशन

एमपीसी न्यूज : देहूरोड येथील स्वयंघोषित पास्टर सॉलोमनराज भंडारे हा बोगस विवाह प्रमाणपत्र वाटप करीत असून कोणतीही  डॉक्टरेट पदवी नसतानाही तो डॉ. उपाधी लावून ख्रिश्चन धर्मीयांची दिशाभूल करीत आहे.  शिवाय धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी नसलेल्या संस्थेच्या माध्यमातून शासकीय संस्थांविरोधात आंदोलन करून बेकादेशीरित्या देणग्याही गोळा करीत आहे, अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केली आहे.

याबाबत रमेशन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना इमेलद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीत  म्हटले आहे की, सॉलोमनराज भंडारे हा देहूरोड येथील स्वयंघोषित पास्टर असून कोणतेही अधिकार नसताना तो बोगस विवाह नोंदणी प्रमाणपत्र वाटप करीत आहे. कोणतीही डॉक्टरेट पदवी धारण केलेली नसतानाही तो डॉक्टर उपाधी लावून ख्रिश्चन धर्मीयांची दिशाभूल करीत आहे.  शिवाय धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी नसलेल्या संस्थेच्या माध्यमातून  शासनाविरोधात आंदोलन करून बेकादेशीरित्या देणग्याही गोळा करीत आहे.

शिवाय तो स्वत: रेव्हरंड असल्याचा दावा करून ख्रिश्चन समुदायाची फसवणूक करीत आहे. महाराष्ट्र विकास समितीचा अध्यक्ष म्हणूनही तो सरकारी संस्थांच्या विरोधात आंदोलन करीत असतो. वास्तविक पाहता महाराष्ट्र विकास समिती ही नोंदणीकृत संस्था नाही. धर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयानेही या संस्थेची नोंदणी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतचे पुरावे रमेशन यांनी तक्रार अर्जासोबत पाठविले आहेत.

सोलोमनराज भंडारे आणि त्यांच्या  सहकाऱ्यांविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.  योग्य कागदपत्रांशिवाय आणि दफनभूमी पासशिवाय मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्याचा गुन्हाही त्याच्याविरोधात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे भंडारे यांच्याविरोधात  कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची  मागणी रमेशन यांनी केली आहे.

 

‘सर्व आरोप बिनबुडाचे, योग्य वेळी पुरावे सादर करीन’

माझ्यावर केलेले आरोप आणि घेतलेल्या आक्षेपासंदर्भात वडगाव न्यायालयात दावा दाखल केला आहे. माझ्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत मी कुणालाही कागदपत्रे दाखवू शकत नाही. मात्र, संबंधित शासकीय कार्यालयांकडून विचारणा झाल्यास तिथे कागदपत्र सादर केली जातील. माझ्यावरील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.

– सोलोमनराज भंडारे, अध्यक्ष, महाराष्ट्र विकास समिती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.