Dehuroad : अ‍ॅमेझॉनवरून मागवला 38 हजारांचा लॅपटॉप; ग्राहकाला मिळाला फरशीचा तुकडा

Rs. 38,000 laptops ordered from Amazon; The customer received a piece of flooring

एमपीसी न्यूज – ऑनलाईन माध्यमातून अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळावरून एका ग्राहकाने 37 हजार 990 रुपये किमतीचा लॅपटॉप मागवला. मात्र, ग्राहकाला लॅपटॉप ऐवजी लालभडक फरशीचा तुकडा मिळाला आहे. हा प्रकार इंद्रायणी सोसायटी, तळवडे येथे घडला आहे.

याबाबत ग्राहकाने अ‍ॅमेझॉनशी संपर्क केला. मात्र, अ‍ॅमेझॉन कंपनीने ‘आम्ही तुम्हाला लॅपटॉप पाठवला होता. बाकी काही माहिती नाही’ असे म्हणून या प्रकरणातून हात वर केले आहेत.

चिन्मय गिरीश मधोळकर (वय 36, रा. इंद्रायणी सोसायटी, तळवडे) असे लॅपटॉप ऐवजी फरशीचा तुकडा मिळालेल्या ग्राहकाचे नाव आहे. मधोळकर यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

चिन्मय यांनी अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून लिनोवा कंपनीचा 37 हजार 990 रुपये किमतीचा लॅपटॉप ऑर्डर केला होता. याचे पैसे चिन्मय यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून भरले.

लॅपटॉपची ऑर्डर त्यांना 29 मे 2020 रोजी सकाळी अकरा वाजता मिळाली. लॅपटॉपची ऑर्डर घेऊन एक डिलिव्हरी बॉय आला. त्याने चिन्मय यांच्या पत्नीकडे लॅपटॉपचे पार्सल दिले.

चिन्मय यांनी पार्सल उघडून बघितले असता सीलबंद पॅकिंगमध्ये लालभडक फरशीचा तुकडा आढळून आला. याबाबत चिन्मय यांनी अ‍ॅमेझॉन कंपनीशी संपर्क केला. ‘कंपनीने तुम्हाला लॅपटॉप पाठवला आहे. बाकी काही माहिती नाही’ असे म्हणून कंपनीच्या प्रतिनिधीने  सरळ हात वर केले.

त्यामुळे अनोळखी व्यक्तीने लॅपटॉप ऐवजी पार्सल मध्ये फरशीचा तुकडा ठेऊन चिन्मय यांची फसवणूक केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.