Pimpri News: ‘शहरातील 62 रुग्णालयांचे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष, कारवाई करा’; उपमहापौर हिराबाई घुले यांची प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील तब्बल 62 रुग्णालयांनी फायर ऑडिट केले नसल्याचे समोर आले आहे. फायर ऑडिटकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे या रुग्णालयांना तात्काळ फायर ऑडिट करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा महापालिका प्रशासनाने रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी प्रशासनाला केली.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, राज्यात मागील काही दिवसांमध्ये शासकीय रुग्णालयात आगीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागला. काही ठिकाणी आयसीयू कक्षात आगीच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, सर्व रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घ्यावे, अशा सूचना राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. रुग्णांची सुरक्षितता लक्षात घेता रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घेणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात एकूण 473 रुग्णालये आहेत. त्यापैकी 266 रुग्णालयांनी खासगी एजन्सीमार्फत फायर ऑडिट करून घेतले. तर, 53 रुग्णालयांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून फायर ऑडिट करून घेतले आहे. अग्निशामक दलाने केलेल्या ऑडिटमध्ये महापालिका रुग्णालयांचा आणि दवाखान्यांचा समावेश आहे, असे एकूण शहरातील 319 रुग्णालयांनी फायर ऑडिट झाले आहे. परंतु, शहरातील 62 रुग्णालयांनी फायर ऑडिट करण्यास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

ऑडिट केले नसल्याची स्थिती आहे हे अत्यंत गंभीर आहे. ऑडिट केले नसल्यामुळे भविष्यात कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये. रुग्णसेवा अखंडित राहून रुग्णांना कोणत्याही अडी अडीचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. या 62 रुग्णालयांना तत्काळ फायर ऑडिट करण्याचे आदेश द्यावेत, अशा सूचना उपमहापौर घुले यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.