Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार?

एमपीसी न्यूज – पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्यास अनुकूलता दाखविल्याचे बोलले जात आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री व्हावं, असा आग्रहवजा आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्यामुळे सरकारस्थापनेतील घडामोडींना आणखी एक नाट्यपूर्ण कलाटणी मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

राजभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे अचानक जाहीर करून सर्वांना धक्का दिला. त्यावेळी या सरकारमध्ये आपण स्वतः सहभागी होणार नाही, मात्र बाहेरून पूर्ण पाठिंबा राहील, अशी भूमिका फडणवीस यांनी जाहीर केली होती.

Eknath Shinde Profile : रिक्षाचालक ते मुख्यमंत्री!; एकनाथ शिंदे यांचा नेत्रदीपक जीवनप्रवास

या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करून मनाचा मोठेपणा दाखवला आहे, मात्र या मंत्रिमंडळात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावे, असा भाजप नेतृत्वाचा आग्रह आहे.’

जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, अशा अशयाचे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.