Dighi : घरफोडी करून 33 तोळे सोने, सव्वा किलो चांदी सोबत अंडरवेअर, बनियन चोरीला

एमपीसी न्यूज – घराचे लोखंडी गेट तोडून, मुख्य दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून 33.2 तोळे सोन्याचे दागिने आणि एक किलो 130 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना गणेशनगर, बोपखेल येथे शुक्रवारी (दि. 27) सकाळी दहा वाजता उघडकीस आली.

अस्लम अल्लाबक्षी खान (वय 35, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याबाबत शनिवारी (दि. 28) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते 27 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत फिर्यादी खान यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य लोखंडी गेट आणि घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला.

घरातील बेडरूममधील कपाटातून 11 लाख 62 हजार 100 रुपये किमतीचे 332 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक किलो 130 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच अंडरवेअर, बनियनचे तीन जोड, क्रॉस कंपनीचा पेन चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.