BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : पोलिसांची भीती नव्हे आदर वाटायला हवा – गिरीश बापट

चिखली पोलीस ठाण्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करायला हवे. पोलिसांबाबत सर्वसामान्यांच्या मनात सकारात्मक चित्र निर्माण व्हायला हवे. पोलिसांची भीती न वाटता त्यांचा आदर वाटायला हवा, असे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले. तसेच कमी संख्याबळ असताना जास्तीतजास्त काम करणारा खरा पोलीस अधिकारी असतो, असे म्हणत त्यांनी आयुक्तालयाच्या मनुष्यबळाच्या अडचणीवर शब्दसुमनांची फुंकर घातली.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते चिखली पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. बापट पुढे म्हणाले की,पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढली असल्याच्या चर्चा वारंवार ऐकायला मिळत आहे. गुन्ह्यांचा आकडा वाढला म्हणजे गुन्हेगारी वाढली असे होत नाही. तर गुन्हेगारांची संख्या मर्यादितच असते. काहीच गुन्हेगार अनेक ठिकाणी गुन्हे करतात, त्यामुळे गुन्ह्यांची संख्या वाढते. गुन्हेगारांची संख्या कमी करणे हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयापुढील सर्वात मोठे आव्हान आहे.”

आयुक्तालयाला अडसर ठरत असलेल्या गोष्टींविषयी बोलताना ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळापासून ते वाहने आणि अन्य विविध संसाधनांपर्यंत विविध गोष्टींची कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. येत्या काही महिन्यात ही कमतरता भरून काढण्यात येईल. आयुक्तालयासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता लवकरच करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

महापौर राहुल जाधव म्हणाले, “चिखली पोलीस ठाणे खूप आधी सुरु होणे गरजेचे होते. त्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला आणि त्याला मंजुरी मिळवून घेतली. आज या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आहे. चिखली भागात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना या भागात आपला दरारा निर्माण करावा लागणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या विकासासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्यामध्ये समन्वय साधला जाणार आहे. आयुक्तालयाच्या समस्या काही प्रमाणात सोडविण्यासाठी महापालिकेकडून देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. औद्योगिक आणि कामगारांची नगरी सुरक्षित होण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू.”

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे मनुष्यबळ कमी आहे. ही सर्वात मोठी अडचण आहे. पण त्याचे भांडवल करून आम्ही कामावर परिणाम होऊ दिलेला नाही.  सध्या आयुक्तालयाच्या हद्दीत संख्यात्मक बदल करण्यापेक्षा गुन्हात्मक बदल करण्यावर आमचा भर आहे. साधी नाकाबंदी करायची असेल तर बॅरीगेट हलविण्यासाठी सुद्धा वाहने नाहीत, त्यामुळे काही उपक्रम राबविणे सध्या शक्य होत नाही. पण आहे त्या मनुष्यबळ आणि संसाधनांमध्ये उत्तम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. नागरिकांनी फोन केल्यास पोलीस आता घटनास्थळी पोहोचत आहेत. हा सध्याचा सर्वात मोठा गुणात्मक बदल आहे. महिला काही वर्षांपासून जाणीवपूर्वक दाबले गेलेले गुन्हे आणि गुन्हेगार आम्ही आता बाहेर काढत आहोत. त्यामुळे गुन्हयाचे प्रमाण सध्या जास्त वाटत आहे. औद्योगिकनगरी मधील गुन्हेगारी कमी कारण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे म्हणाले, “चिखली पोलीस ठाण्याचा भाग पूर्वी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत होता. देहूरोड पोलीस ठाण्यापासून हा परिसर खूप दूर आहे. यामुळे देहूरोड पोलिसांना या भागावर नियंत्रण ठेवणे कठीण होत होते. 2009 साली हा भाग निगडी पोलीस ठाण्यात समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर देखील या भागाला स्वतंत्र पोलीस ठाणे असण्याची मागणी आणि आवश्यकता वाटू लागली. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अशा सर्व स्तरावर प्रयत्न सुरु झाले. 1 मार्च 2018 रोजी राज्य शासनाने चिखली पोलीस ठाण्याचा नवीन अद्यादेश जारी केला. त्यानंतर सर्व हालचाली होऊन आज अखेर चिखली पोलीस ठाणे सुरु झाले आहे. यामुळे या भागातील गुन्हेगारी काम करून शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यास पोलीस प्रयत्नशील राहणार आहेत.”

चिखली पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौक्या
कुदळवाडी
रुपीनगर
साने चौकी
घरकुल (प्रस्तावित)

चिखली पोलीस ठाण्यासाठी फौजफाटा –
वरिष्ठ पोलीस निरीक्षक – 1
पोलीस निरीक्षक (गुन्हे) – 1
सहाय्यक पोलीस निरीक्षक – 2
पोलीस उपनिरीक्षक – 5
कर्मचारी – 100

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय –

पोलीस स्टेशन
पुणे पोलीस आयुक्तालय – 30
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय -15

क्षेत्रफळ
पुणे पोलीस आयुक्तालय – 343 चौकिमी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय – 518 चौकिमी

लोकसंख्या
पुणे पोलीस आयुक्तालय – 60 लाख
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय – 40 लाख

गुन्हे दाखल (सन 2017)
पुणे पोलीस आयुक्तालय – 13 हजार
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय – 8 हजार

अधिकारी
पुणे पोलीस आयुक्तालय – 550
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय – 150

कर्मचारी
पुणे पोलीस आयुक्तालय – 9000
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय – 2000

लिपीक
पुणे पोलीस आयुक्तालय – 300
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय – 15

वाहने
पुणे पोलीस आयुक्तालय – 866
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय – 42

दुचाकी (मार्शल)
पुणे पोलीस आयुक्तालय – 550
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय – 42

.

HB_POST_END_FTR-A1
.