Pimpri: ‘लॉकडाउनमधून कोणालाही वगळू नका, कडक अंमलबजावणी करा’

'Don't exclude anyone from the lockdown, do strict implementation.'- Demands Maruti Bhapkar.

एमपीसी न्यूज – कोरोना संक्रमण साखळी खंडित होण्यासाठी सोमवार 13 जुलै 2020 पासून सुरु होणाऱ्या लॉकडाउन मधून कोणालाही वगळू नये. कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांना निवेदन पाठविले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पुणे, पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोणाचा कहर सुरू आहे.

जुलै महिन्यात दररोज 300 ते 400 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. या महामारीचा विळखा शहरात अधिक घट्ट झाला असून बाधित रुग्णांच्या संख्येने सात हजारांचा टप्पा ओलांडला आहे‌. तर यामध्ये एकूण 138 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि आपण सोमवारपासून दहा दिवसाचा कडक लॉकडाउन करण्याची घोषणा केली आहे‌.

देशपातळीवर 24 मार्च 2020 लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता‌. तो तब्बल 55 दिवस चालला.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अत्यावश्यक सेवा असलेल्या कारखान्यांना काही निर्बंध घालून 30 टक्के कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली गेली. त्यानंतर पंधरा दिवसानंतर इतरही सर्वच उद्योग सुरू करण्यात आले.

त्यावेळी हे उद्योग सुरू करताना जिल्हाधिकारी यांनी नियमावली दिली होती. मात्र या नियमाचे व निर्बंधाचे उद्योग कारखान्याच्या ठिकाणी पालन झाले नाही.

त्यामुळे कामगारांमध्ये हि कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण झाले.

उद्योजकांना अशा प्रकारची सवलत दिली. तर कोरोना संक्रमणाची साखळी खंडित होणारच नाही‌.

त्यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण वाढत जाईल. जर कामगारांना कोरोनाची लागण झाली तर त्याचा खर्च हे उद्योजक करणार आहेत कायॽ

जर एखाद्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदत हे उद्योजक देणार आहेत कायॽ

या दहा दिवसाचा लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाचे समूळ उच्चाटन होणार नाही हे खरे आहे‌, मात्र अतिशय जलद गतीने कोरोना संक्रमणाच्या साखळीला ब्रेक होण्यास मदत होईल‌.

तसेच प्रशासनाला अधिक उपाययोजना करण्यास उसंत मिळेल. प्रशासनाच्या हाताबाहेर चाललेल्या परिस्थितीवर नियंत्रण येण्यास मदत होईल.

तसेच आज सर्वच रुग्णालयात रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था नाही. कोरोना रुग्णांची उपचारासाठी शेकडो नावे वेटिंगवरती आहेत‌‌.

अशा परिस्थितीत हा दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन झाला. तर शहरात कोरोना संक्रमण काही अंशी नियंत्रणात येण्यास मदत होईल‌. त्यामुळे अनेक नागरिकांचे अमूल्य प्राण वाचतील.

उद्या सोमवार 13जुलै पासूनच्या या लॉकडाऊन मधून अत्यंत आवश्यक बाबी वगळता कोणालाही सवलत देऊ नये. दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन करताना गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्याची मोहीम हाती घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.