Shikshan Samwad : यशासाठी हवा सकारात्मक दृष्टिकोन – डॉ. अ. ल. देशमुख

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद (डॉ. अ. ल. देशमुख) – आयुष्यात केवळ परीक्षेतचं नव्हे, तर कोणत्याही पेचप्रसंगांना सामोरं जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन सर्वांत उपयोगी पडतो. पाल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास पालकांची भूमिका खूपच महत्त्वाची ठरते.

मला आजही माझी मुलगी अक्षदा हिच्या बाबतीतील तो प्रसंग आठवतो. ती सातवीत असताना समाजशास्त्र या विषयात नापास झाली होती. या विषयात तिला 100 पैकी फक्त 27 गुण मिळाले होते. आई रागावेल म्हणून ती खूप घाबरलेली होती. मानसिक दृष्ट्या अस्थिर झाली होती. आईचा ओरडा बसू नये म्हणून तिनं स्वतःच प्रगतीपत्रकात समाजशास्त्र विषयाचे 27 चे 47 गुण केले होते.

प्रथम सत्राचे प्रगतीपत्रक मिळाल्यावर तिनं सहीसाठी प्रगतीपत्रक माझ्याकडे आणलं. मी स्वतः शिक्षक असल्याने तिच्या शाळेतील सर्व शिक्षक माझे मित्र होते. ती समाजशास्त्रात नापास झाल्याचं त्यांच्याकडून कळलं होतं. प्रत्यक्षात प्रगतीपत्रक पाहिल्यावर मात्र, मी हादरलो. काही वेळ शांत बसलो. थोडा विचार केला. तिला रागावलो नाही. तिचा अपमानही केला नाही. थोड्यावेळानं सही करतो, असं तिला सांगितलं.

घरातील सर्व मंडळी बाहेर गेली. तेव्हा घरात ती आणि मी दोघंच असताना तिला बोलावलं. आमच्या शाळेतील दोन विद्यार्थिनींच्या प्रगतीपत्रकात स्वतःच गुण वाढविण्याच्या कथा सांगितल्या. त्या मुलींना शाळेने किंवा मी काय शिक्षा करावी, असा प्रश्‍न तिला विचारला. विचार करून थोड्या वेळानं उत्तर दे, असं सांगितलं.

अन् ती एकदम ओक्साबोक्शी रडायला लागली.  म्हणाली, “बाबा, कमी मार्क पडल्यास बडवून काढीन, तुला घरात घेणार नाही, असं आई म्हणाली होती. त्यामुळे मी असं केलं. मी पुन्हा असं कधीच करणार नाही.” मी आश्चर्यानं तिला, काय केलंस तू?’,’ असं विचारलं, प्रगतीपत्रकात फेरफार केल्याची कबुली तिने स्वतःहून दिली.

मी तिची समजूत काढली. त्या वेळी मी तिला दिलेले उत्तर महत्त्वाच आहे, मी तिला सांगितलं, “अक्षदा, तू सर्व विषयांत नापास झालीस तरी मला चालेल. पण वागण्यात, वर्तणुकीत कधीही नापास होऊ नकोस. त्यात तुझा सतत पहिलाच नंबर असावा, असं मला वाटतं.” त्यानंतर शाळेतील एक चांगली विद्यार्थिनी म्हणून ती सर्वश्रुत झाली. अभ्यासातही पहिल्या दहात येऊ लागली.

वागणं आणि हुशारी यांचा जवळचा सहसंबंध आहे, हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याही असे अनेक अनुभव असतील. मुलांना घडविताना आपला दृष्टिकोन सकारात्मक आहे, की नकारात्मक हे पालकांनी तपासावं. सतत नकारघंटा वाजविणारी मंडळी एकाही गोष्टीकडे सकारात्मकतेनं पाहत नाहीत. पाल्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यात पालकांची आणि वडीलधाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते.

आपला मुलगा एका विषयात नापास झाला आहे, असे म्हणण्यापेक्षा पाच विषयांत पास झाला आहे, असा सकारात्मक विचार करणारे पालक आणि मुलं अपयशानं खचून जात नाहीत. उलट – चिंतन करून, अपयश का आलं, त्याची कारणं कोणती, अपयशातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे, याचा विचार करतात आणि तो केला पाहिजे. यापुढे पूर्ण तयारीनिशी प्रयत्न करण्याचा विचार मुलांच्या मनात येण्यासाठी पालकांनी सतत आशादायी बोललं तसेच सतत सकारात्मक कृती केली पाहिजे.

याबाबतीत एडिसन या शास्त्रज्ञांचं उदाहरण चपखल आहे. एकदा त्यांच्या फिल्मेंटच्या फॅक्टरीला आग लागली. सर्व रेकॉर्ड, साहित्य जळून खाक झालं. सर्वांच्या प्रतिक्रिया, ‘ओरेरे…फार वाईट झालं, अशा होत्या. पण, एडिसनची प्रतिक्रिया मात्र, “Now I have burned all my mistakes!“, अशी होती, जिद्दीने कामाला लागून त्याने पहिल्यापेक्षा उत्तम फॅक्टरी उभी केली. याला म्हणतात सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.