Dr. Amol Kolhe : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे (Dr. Amol Kolhe )खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (मंगळवारी, दि. 26) शरद पवार यांची भेट घेतली. मोदी बागेतील कार्यालयात त्यांची भेट झाली. सोमवारी अजित पवार यांनी डॉ. कोल्हे यांच्या विरोधात दिलेल्या उमेदवाराला निवडून आणतो, असे म्हणत कोल्हे यांना टोला लगावला होता.

त्यानंतर कोल्हे यांनी घेतलेली शरद पवार यांची भेट महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, ही भेट शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Indrayni River : इंद्रायणी नदीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा – दीपक केसरकर

खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे हे (Dr. Amol Kolhe )शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची सुरुवात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून होणार आहे. हा मोर्चा बुधवार (दि. 27 डिसेंबर) ते शनिवार (दि. 30 डिसेंबर) या दरम्यान शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा होणार आहे. याबाबत सोमवारी अजित पवार यांना विचारले असता त्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांना टोला लगावला.

अजित पवार म्हणाले, जे खासदार मतदारसंघात देखील फिरत नव्हते, ते आता निवडणुका जवळ आल्याने पदयात्रा काढत आहेत. मध्यंतरी ते खासदार राजीनामा देण्याच्या तयारीत होते. काळजी करू नका आगामी निवडणुकीत त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार निवडून आणून दाखवेन.’

अजित पवार यांच्या या विधानानंतर खासदार डॉ. अमोल अमोल कोल्हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. ‘अजितदादा मोठे नेते आहेत. ते जर माझ्याविषयी बोलले असतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. माझे चुकत होते तर पाच जुलैच्या आधी त्यांनी कान का धरले नाहीत. ते धरले असते तर मी सुधारणा केली असती, अशी प्रतिक्रिया खासदार कोल्हे यांनी दिली.

दरम्यान, कोल्हे यांनी मंगळवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी X या सोशल मिडीयावर पोस्ट करत या भेटीची माहिती दिली. ‘शरद पवार यांचे धोरण हे कायमच शेतकरी हिताचे असते. म्हणूनच त्यांना मायबाप जनता ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ म्हणून ओळखते. या शेतकरी आक्रोश मोर्चा बद्दल त्यांचं याआधी सुद्धा मोलाचं मार्गदर्शन मिळालं होतं. आजची त्यांची भेट शेतकऱ्यांसाठी आणखी जोमाने लढण्याची ऊर्जा व प्रेरणा देणारी होती’, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.