ENG vs PAK : पाकिस्तानवरच्या रोमांचक विजयासह इंग्लडने मिळवले दुसऱ्यांदा जेतेपद

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानला 5 गडी राखून नमवत इंग्लड दुसऱ्यांदा विश्वकप विजेता झाला आहे. सामना होईल न होईल,पाऊस येईल न येईल साऱ्या चर्चा हवेत विरल्या.मेलबोर्न च्या ऐतिहासिक एमसीजी मैदानावर (ENG vs PAK) जागतिक टी-20 विश्व करंडक स्पर्धेचा अंतीम सामना आज पाकिस्तान विरुद्ध इंग्लड या दोन एकेकदा विजेते असलेल्या संघात निर्विघ्नपणे पार पडला,ज्यात इंग्लड संघाने जोरदार खेळ करत पाकिस्तान संघाला पाच गडी आणि एक षटक राखुन पराभूत केले आणि विश्व कप स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. अष्टपैलू सॅम करन, अनुभवी बेन स्टोक, आदिल रशीद या जेतेपदाचे अंतीम सामन्यातले नायक ठरले.

अनेक मोठमोठ्या संघाला या विश्वकप स्पर्धेत पहिल्या सामान्यापासूनच अनिश्चित निर्णयाला सामोरे जावे लागले होते.आजही तसाच काही चमत्कार होईल का?वरुणराजा यात काही अडथळा आणेल का ?अशा चर्चा सामन्याच्या आधी होत होत्या, पण आपल्या वेधशाळेसारखेच अंदाज ऑस्ट्रेलियन वेधशाळेचे असतात हा सुखद(?)प्रत्यय असंख्य भारतीयांना आज आला अन या 2022 सालच्या जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम सामन्याचा प्रत्यक्ष आनंद मैदानावर अन मैदानाबाहेरील अनगीनत क्रिकेट रसिकांना आज घेता आला.खरेतर उपांत्यफेरीत  भारतीय संघाच्या झालेल्या दणदणीत पराभवामुळे भारतीय चाहत्यांची खूप मोठी निराशा झाली होती, त्यामुळे अंतिम सामन्याचा आनंद तसा निरसच होता, पण खरे क्रिकेट रसिक मात्र या सामन्याकडे डोळे लावून बघत होते. त्यांना मात्र या सामन्यात एक चांगली अन रोमहर्षक लढत बघायला मिळाली.

आज इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने महत्वाची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बाबर आझमच्या पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले.या फॉरमॅट मध्ये 2009 साली पाकिस्तान विजयी ठरले होते तर इंग्लड 2010 साली. (ENG vs PAK) वेस्ट इंडिजने ही स्पर्धा सर्वाधिक दोन वेळा जिंकली होती, आज त्याची बरोबरी करण्याची संधी दोन्हीही संघाला होती त्यात इंग्लड संघाने बाजी मारली.

आज पाकिस्तान संघाची सुरुवात अतिशय खराब अशी झाली.जबरदस्त लयीत असलेल्या अन या प्रकारच्या क्रिकेटमध्ये एक अतिशय स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहम्मद रिझवानला आजच्या सामन्यात मात्र त्या लौकिकास जागता आले नाही अन केवळ 14 चेंडूत 15 धावा करुन तो सॅम करनच्या गोलंदाजीवर त्रिफळा बाद झाला.अन या धक्क्यातून सावरण्याआधीच मोहम्मद हरिस आदिल रशीदची शिकार झाला,त्याने केवळ 8 धावा केल्या.यावेळी पाकिस्तानची धावसंख्या 8 व्या षटकाच्या दरम्यान दोन बाद 45 अशी झाली होती.

यानंतर मात्र कर्णधार बाबर आझम आणि शान मसुद या जोडीने सामंजस्य दाखवत चांगली फलंदाजी करायला सुरूवात केली.खराब चेंडूंचा योग्य तो समाचार घेत या जोडीने डावाला आकार द्यायला सुरुवात केलीय असे वाटत असतानाच आदिल रशीदने पाकिस्तान कर्णधार बाबर आझमला वैयक्तिक 32 धावांवर असताना चकवले आणि पाकिस्तान संघाला मोठा धक्का दिला.(ENG vs PAK) पुढच्याच षटकात बेनस्टोकने इफ्तीखार अहमदला बाद करुन पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का दिला.मात्र शान मसूदने धीर न सोडता दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी करत संघाला सावरण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले.त्याला शादाब खाननेही उपयुक्त साथ दिली, पण या दडपणाचा इंग्लिश गोलंदाज उत्तम फायदा उठवण्यात यशस्वी ठरत असल्याने पाकिस्तानच्या डावाला फारशी बळकटी आली नाहीच.

डावाच्या 17 व्या षटकात सॅम करनने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी त्याची उपयुक्तता सिद्ध करताना शान मसूदला बाद करुन इंग्लड संघाला मोठे यश मिळवून दिले,यानंतर पाकीस्तानचा डाव सावरला नाही तो नाहीच.आपल्या निर्धारित 20 षटकात पाकिस्तान संघाला 8 गडी गमावून फक्त 137 धावाच करता आल्या अन तिथेच इंग्लड संघाच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता. पाकिस्तान संघाकडुन मसूदने सर्वाधिक 38 तर त्याखालोखाल कर्णधार बाबरने 32 धावा केल्या. इंग्लड संघाकडून सॅम करनने अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्या चार षटकात फक्त 12 धावा देत तीन गडी बाद केले,तर त्याला आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डनने दोन दोन गडी बाद करत उत्तम साथ दिली.

आपल्या दुसऱ्या जेतेपदासाठी 120 चेंडुत 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लड संघाची  सुद्धा सुरुवात अतिशय खराब अशीच झाली होती. उपांत्यफेरीच्या सामन्यात जबरदस्त खेळी करणारा अलेक्स हेल्स आज काहीच खास करु शकला नाही अन शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकातल्या अखेरच्या चेंडूवर फक्त 1 धाव करुन त्रिफळाचीत झाला  अन जगातली सर्वाधिक भेदक म्हणवली जाणारी पाकिस्तानी गोलंदाजी इंग्लड संघाला या लक्ष्याला सहजासहजी गाठू देणार नाहीत हेच आफ्रिदीने जणू या विकेटद्वारे सांगितले.(ENG vs PAK) फिलिप सॉल्टला हे दडपण झेपले नाही तो केवळ 10 धावांवर असताना हरिस रौफच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला अन थोड्याच वेळात त्यानेच कर्णधार जोस बटलरची 26 धावांची छोटी पण आक्रमक खेळी खल्लास करत इंग्लड संघापुढे काय वाढून ठेवले आहे,याचाच इशाराही दिला.

यावेळी इंग्लड संघाची अवस्था  5.3 षटकात 3 बाद  45 अशी बिकट झाली होती. सामना रंगतदार होणार हे यावेळी कळत होतेच,त्याचसोबत पाऊस आला तर काय होणार हा प्रश्नही होताच.मात्र या कठीण परिस्थितीत अनुभवी बेनस्टोक आणि हॅरी ब्रूक या जोडीने 39 धावांची छोटी पण महत्वपूर्ण भागीदारी करत डकवर्थ लुईसच्या समिकरणानुसार विजयासमीप आणले.ही जोडी जमली आहे असे वाटत असतानाच शादाब खानने ब्रूक्सला वैयक्तिक 20 धावांवर असताना शाहीन आफ्रिदीच्या हातून झेलबाद करुन पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा विजयाची आस दाखवली खरी,पण त्यांच्या आणि विजयाच्या मध्ये बेनस्टोक अभेद्य उभा होता.(ENG vs PAK) त्याने इतिहासातल्या शूरवीर सरदार तानाजीसम लढून गड ही आणला आणि कप ही.बेनस्टोकने आपल्या अनुभवाचा आणि क्रिकेट प्रगल्भतेचा त्याने योग्य तो वापर करत खराब चेंडूचा योग्य तो समाचार घेत सर्व दडपण झुगारून लावले,त्याला मोईन अलीनेही जबरदस्त साथ दिली. त्यामुळेच इंग्लड संघाला दुसऱ्या जेतेपदाला गवसणी घालता आली.

बेनस्टोकने अंतीम सामन्यात एक अविस्मरणीय खेळी करत नाबाद अर्धशतक करत पाकिस्तान संघाला निराश केले,हे त्याचे पहिलेचे अर्धशतक आहे.त्याने शाहीन अफ्रिदीच्या एका षटकात 1 उत्तुंग षटकार आणि त्या पाठोपाठ एक खणखणीत चौकार मारत इंग्लड संघावर आलेले दडपण(ENG vs PAK) एका क्षणी कमी केले अन मग इंग्लंड संघाने मागे वळून बघितले नाहीच.2019 साली लोर्ड्सवर एकदिवशीय विश्व कप सर्धेत विजयी ठरलेल्या इंग्लड संघाने या स्पर्धेत आधी पराभवाला सामोरे जात(आयर्लंड संघाकडुन)आपल्याच गोटात खळबळ उडवून दिली होती, पण त्यानंतर पुढील सामन्यात जबरदस्त खेळ करत इतिहास रचला आणि आज अंतीम सामन्यात पाकिस्तान संघाला 5 गडी आणि एक षटक  राखून पराभूत करत दुसऱ्यांदा विश्व कप जिंकून वेस्ट इंडीज संघाची बरोबरी केली.

अतिशय भेदक गोलंदाजी करुन पाकिस्तान च्या डावाला खिंडार पाडणारा सॅम करन सामन्याचा व मालिकेचाही मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान 8 बाद 137

आझम 32,शान मसूद 38 ,शादाब खान 20,रिझवान 15  

सॅम करन 12/3,आदिल रशीद 22/2,जॉर्डन 27/2

पराभूत विरुद्ध 

इंग्लड 5 बाद 

बटलर 26,हेल्स 1,सॉल्ट 10,मोईन 19,ब्रूक्स 20 बेनस्टोक नाबाद 52

रौफ 23/2, शादाब खान 20/1 अफ्रिदी 13/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.