Pimpri News : तीन वेळा निविदा प्रसिध्द करुनही एकच निविदादार

'सिटी सेंटर'साठी सल्लागाराला 2 कोटी देणार

एमपीसी न्यूज – मुंबई , नवी दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे ‘सिटी सेंटर’ बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तीन वेळा निविदा प्रसिध्द करुनही केवळ एकच निविदा प्राप्त झाली. त्यामुळे केपीएमजी अ‍ॅडव्हायझर सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार एजन्सीची निवड करण्यात आली. या सल्लागार संस्थेला 12  महिन्यांसाठी 2 कोटी 9 लाख रुपयांचे शुल्क दिले जाणार आहे.

महापालिकेने चिंचवड स्टेशन येथील डी मार्टजवळील 1 लाख 37  हजार 39.46 चौरस मीटर इतकी जागा पिंपरी – चिंचवड बिझनेस सेंटरसाठी आरक्षित केली आहे. महापालिकेस भरीव स्वरुपाचे आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर सिटी सेंटर बांधण्यात येणार आहे. सिटी सेंटरमध्ये कार्यालये, हॉटेल, करमणूक केंद्र, व्यापारी गाळे, बहुउद्देशीय हॉल, वाहनतळ आदी सुविधा असणार आहेत. नवी दिल्लीतील हेबिहाट सेंटर, मुंबईतील माइन्स स्पेस मालाड आणि बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, हुस्टन सिटी अमेरीका या धर्तीवर हे सेंटर उभारले जाणार आहे.

सिटी सेंटरच्या कामासाठी सल्लागार नियुक्तीसाठी देशपातळीवर निविदा प्रसिध्द करण्यात आली. तीन वेळा निविदा प्रसिध्द करुनही केवळ एकच निविदा प्राप्त झाली. केपीएमजीची एकमेव निविदा पात्र ठरली आहे. अनुभव, अहवाल आणि सादरीकरणात त्या एजन्सीला 100 पैकी 88  गुण मिळाल्याने ती एजन्सी पात्र ठरली आहे. महापालिकेने 3 कोटींचा दर निश्चित केला होता. एजन्सीचा जीएसटी वगळून 2 कोटी 9 लाख देण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी 5 फेब्रुवारीला मान्यता दिली.त्यास स्थायी समितीनेदेखील मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.