Pune news : पावसामुळे भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड 

एमपीसी न्यूज – कात्रज कोंढवा परिसरात मुसळधार पाऊस व साचलेल्या पाण्यामुळे 22 केव्हीच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये गुरुवारी (दि. 20) सायंकाळी बिघाड झाला.(Pune news) या दोन्ही भूमिगत वाहिन्यांमध्ये एकमेकांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा करण्याची सोय आहे. मात्र दोन्ही वाहिन्या नादुरुस्त असल्याने तांत्रिक कामे करून इतर ठिकाणाहून वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

भारव्यवस्थापन शक्य नसल्याने गोकूळनगर, शिवशंभो गल्ली क्र. 2ते 4, पॅरामाऊंट गार्डनच्या सोसायट्या, राजमाता कॉलनी, टिळेकरनगर, समर्थनगर या परिसरातील सुमारे २२०० ग्राहकांचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि. 21) सकाळी 8.30 वाजता सुरळीत करण्यात आला. महावितरणच्या राजीव गांधी 22/22 केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या कात्रज-कोंढवा 22 केव्ही भूमिगत वाहिनीमध्ये कात्रज स्मशानभूमीजवळ ओढ्यानजीक साचलेल्या पाण्यामुळे काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास दोन ठिकाणी बिघाड झाला. त्याच सुमारास 22/22 आकृती उपकेंद्रातून निघणाऱ्या इस्कॉन 22 केव्ही भूमिगत वाहिनीमध्ये देखील साचलेल्या पाण्यामुळे आर्द्रता निर्माण होऊन दोन ठिकाणी बिघाड झाला.

Diwali celebration : शाही अभ्यंगस्नान, नवे कपडे, फराळाच्या आस्वादाने ‘त्यांनी ‘ लुटला दिवाळीचा आनंद !

या दोन्ही वीजवाहिन्यांमध्ये एकमेकांना पर्यायी वीजपुरवठा करण्याची सोय आहे. मात्र दोन्ही वाहिन्या नादुरुस्त झाल्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर तांत्रिक कामे करून वीजपुरवठ्याची पर्यायी सोय केली. यामध्ये तासाभरात कात्रज-कोंढवा 22 केव्ही वाहिनीवरील सर्व परिसराचा वीजपुरवठा भिलारेवाडी वीजवाहिनीद्वारे सुरु करण्यात आला.

तसेच नादुरुस्त झालेल्या इस्कॉन 22 केव्ही या दुसऱ्या भूमिगत वाहिनीचा 60 टक्के वीजपुरवठा लेकटाऊन उपकेंद्र व इतर ठिकाणाहून सुरु करण्यात आला. मात्र गोकूळनगर, शिवशंभो गल्ली क्र. 2 ते 4, पॅरामाऊंट गार्डन, पॅरामाऊंट इरोस, माऊलीनगर, समर्थनगर, राजमाता कॉलनी, आंबेडकरनगर, टिळेकरनगर या परिसरातील सुमारे 2200 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु होऊ शकला नाही. महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर दुरुस्तीचे काम करून आज सकाळी 8.30 वाजता या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.