Pune News : लग्नासाठी अल्पवयीन मुलीला धमकावणाऱ्या गुंडावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला तोंडावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली. 18 वर्षाची होईपर्यंत वाट पाहतो परंतु लग्न मात्र माझ्याशीच करायचं नाहीतर तुला जाळून टाकेल अशी धमकी या सराईत गुंडाने तिला दिली होती. पोलिसांनी सराईत गुंड विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मोहम्मद हुसेन खान (वय 45) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीने या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

येरवड्यातील गाडीतळ परिसरात ही तरुणी राहते. तर त्याच परिसरात आरोपी देखील राहतो. जून 2021 पासून आरोपी या तरुणीला त्रास देत होता. एके दिवशी फिर्यादी तरुणी घरात असताना आरोपीने मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी घरात फेकली आणि तिला फोन करण्यास सांगितले. अन्यथा घरात घुसून तुझ्या तोंडावर अँसिड फेकले अशी धमकी देखील त्याने तिला दिली होती.

आरोपी येता-जाता या तरुणीला आय लव्ह यू बोलून भीती दाखवून पाठलाग करायचा. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जाळून मारून टाकेल. तुझे वय अठरा पूर्ण होईपर्यंत मी तुझी वाट पाहीन पण तू माझ्याशी लग्न कर अशी धमकी देखील त्याने दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.