India vs England Highlights : भारतीय गोलंदाजानी आघाडी मिळवून देण्याची सुवर्णसंधी गमावली

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) -भारतीय गोलंदाजांनी हातातली संधी गमावली. इंग्लंड खराब परिस्थितीतुन सावरले. इंग्लंड संघाची पाच बाद 63 अशी बिकट अवस्था शुक्रवारी सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर काही क्षणातच झाली.

आता फक्त तळातले फलंदाजच उरलेले होते आणि जवळपास 118 धावांनी ते पिछाडीवर होते, त्यामुळे भारतीय गोलंदाज इंग्लिश शेपटाला अजिबात वळवळ करू देणार नाहीत असे वाटत असतानाच इंग्लिश फलंदाजानी जबरदस्त फलंदाजी करत छोट्या छोट्या सोबत एक मोठी भागीदारी करत प्रथम भारतीय धावसंख्या गाठली आणि नंतर 99 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेत भारतीय संघावर दडपण वाढवले.

जागतिक दर्जाची जलदगती गोलंदाजी असा नावलौकिक असलेल्या बुमराह आणि त्याच्या जोडीदारांना इंग्लंड संघाच्या तळातील फलंदाजाना रोखता आले नाही आणि हातात आलेली बाजी आज तरी पलटली असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

आजचा खेळ सुरू झाला आणि काही क्षणातच डेव्हिड मलान आणि ख्रिस ओव्हर्टनला बाद करण्यात उमेश यादव यशस्वी ठरला खरा,पण नंतर ओली पोप आणि बेअरस्टो यांनी बघताबघता जोडी जमवत धावफलकावर धावाही जमा केल्या.

पोप आज अत्यंत जिद्दीने आणि जबाबदारीने खेळत होता, त्याला प्रथम जॉनी बेअरस्टोने आणि नंतर मोईन अलीने उत्तम साथ देत संघाला 99 धावांची खूप महत्वपूर्ण ठरेल अशी आघाडी मिळवून दिली, आणि त्यानंतर ख्रिस वोक्सने जखमेवर मीठ चोळत चक्क स्वतःचे  अर्धशतक करत आपले पुनरागमन जोरदार साजरे करत भारतीय गोलंदाजी बोथट ठरवली.इंग्लंड संघाच्या तळाच्या फलंदाजानी भारतीय मोठमोठ्या फलंदाजाना जे जमले नाही ते करून दाखवत आजच्या दिवसाच्या खेळावर इंग्लंड संघाच्या नावे केला.

भारतातर्फे उमेश यादवने तीन बळी मिळवून आपले पुनरागमन साजरे केले तर त्याला बुमराह आणि जडेजाने दोन दोन बळी मिळवत बऱ्यापैकी साथ दिली खरी पण तोवर इंग्लंड संघाकडे पहिल्या डावाअखेर 99 धावांची महत्वपूर्ण आघाडी आली होती.

99 धावांनी मागे असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात मात्र कुठलेही दडपण न घेता  उरलेला  तास भराचा खेळ करत एकही बळी न गमावता नाबाद 43 धावा जमवल्या आहेत. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अनुक्रमे नाबाद 20 आणि 22 धावा आपल्या नावावर नोंदवत आम्ही इतक्या सहजपणे सामना सोडणार नाही असेच जणू सुचवले आहे.

सामन्याचे केवळ दोनच दिवस झाले असल्याने हा सामना नक्कीच निकाली होईल असेच वाटत आहे, भारतीय फलंदाज जर उद्या आज जसे खेळले तसेच नेटाने खेळले  तर सामना नक्कीच रंगतदार होऊ शकतो, नाही का?

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.