Sureshbhai Shah : तळेगावचे माजी नगराध्यक्ष व माजी जिल्हा संघचालक सुरेशभाई शहा यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष (Sureshbhai Shah) तसेच मावळ तालुका व पुणे जिल्ह्याचे माजी संघचालक सुरेशभाई लालचंद शहा (वय 87) यांचे काल (रविवारी) रात्री साडेदहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सुरेशभाई शहा यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) दुपारी चार वाजता तळेगाव येथील बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यकर्ते यतीन शहा यांचे ते वडील होत.

वयोमान झाल्यानंतर देखील ते शेवटपर्यंत सार्वजनिक कार्यात सक्रिय होते. दोन दिवसापूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना काल रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Pune News : चतु:शृंगी, डेक्कन आणि कोथरूड पोलीस ठाण्यात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

सुरेश भाई शहा हे भारतीय जनता पक्षाचे जनसंघापासूनचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी कांचनभाई शहा, रमणभाई शहा या कार्यकर्ता पिढीचा वारसा चालविला. संघ बंदीच्या काळात त्यांनी 19 महिने कारावास भोगला होता.

मावळातील विविध शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक संस्थांशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून त्यांनी (Sureshbhai Shah) अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली होती. इंद्रायणी विद्या मंदिरचे संचालक, उद्योगधामचे अध्यक्ष, पूजनीय गुरुजी न्यासचे अध्यक्ष, गणेश मोफत वाचनालयाचे अध्यक्ष, ग्रामदैवत महाराज मंदिराचे विश्वस्त, विठ्ठल मंदिराचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

तळेगावातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या निधनाने तळेगावकर शोककळा पसरली असून काही शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.