Pune News : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पूर्ण अर्थसंकल्पीय तरतूद

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 70 कोटी रुपयांची पूर्ण अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिका क्षेत्रात खराडी, वडगाव खुर्द येथे प्रत्येकी एक आणि हडपसर येथे तीन असे पाच प्रकल्प आवास योजनेअंतर्गत सुरू असून, 2918 सदनिकांचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी अंदाजपत्रकात 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कोविड काळात विविध प्रकारच्या आरोग्य विषयक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सर्वच भांडवली विकासकामांवरील तरतुदींमध्ये दहा टक्के कपात करण्यात आली होती. त्या प्रमाणे आवास योजनेच्या तरतुदीत सात कोटी रुपयांची कपात करण्यात आली होती.

रासने पुढे म्हणाले, मात्र या प्रकल्पांची महारेरा कायद्या अंतर्गत नोंदणी झाली असल्यामुळे निर्धारीत वेळेत लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देणे आवश्यक आहे. अन्यथा महारेराच्या वतीने दंड आकारला जाऊ शकतो. वेळेत काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने विशेष बाब म्हणून आवास योजनेतील निधीत 10 टक्के कपात न करता, अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे पूर्ण 70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.