Pimpri news: टोळक्याचा धुडगूस; रहाटणी, पिंपरीत वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून शहरात वाहन तोडफोडीच्या घटना सातत्याने घडत आहे. केवळ त्याची कारणे बदलत आहेत.  शुक्रवारी (दि.30) रात्री  नेहरूनगर आणि रहाटणी येथे टोळक्याने दगडफेक करत तलवार आणि कोयत्याने काही वाहनांची तोडफोड केली. याबाबत वाकड, पिंपरी ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

नेहरूनगर येथील घटनेप्रकरणी नीलेश जाधव  यांनी  पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष जगधने, इरफान शेख, जितेश मंजुळे, जावेद औटी, आकाश हजारे यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जाधव हे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास  कारमध्ये लॅपटॉप ठेवण्यासाठी गेले असता समोरून तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंटचे ब्लॉक, दगड, विटा घेऊन टोळके आले. त्यातील एकाने जाधव याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तलवारीने वार केला.  सिमेंटचे ब्लॉक डोक्यात मारले. परिसरातील वाहनांची तोडफोड केली. धुडगूस घातला.

रहाटणीतील तोडफोडीप्रकरणी आकाश जाधव (वय 23, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम कवठेकर, राहुल  उके, दीपक  मिसाळ, मंगेश  सकपाळ, सूरज  पाटाळे, कैलास  वंजारी, आकाश  कांबळे, सनी गवारे (पूर्ण नाव पत्ता समजू शकली नाहीत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास आकाश हा घरासमोरील कट्ट्यावर बसला होता. आरोपी शुभम कवठेकर याने जुन्या भांडणाच्या कारणावरून  आकाश याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. बाकी आरोपींनी  मोठमोठ्याने शिवीगाळ केली. हातामध्ये दगड घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.