Pimpri : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाने राबवला स्वच्छतेविषयी अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यपूर्व काळात संघटन व समाजजागृती व्हावी या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. पुढील काळात त्याचे स्वरुप हळूहळू बदलत गेले. पण समाजापुढे काही गोष्टींचा आदर्श निर्माण करायचा असेल तर गणेशोत्सव हे एक चांगले व्यासपीठ आहे. आणि याच विचाराने परिसराची व पर्यायाने शहराची स्वच्छता करण्यासाठी लोकांचा सहभाग निर्माण करण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे असे लक्षात घेऊन निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या वतीने बुधवारी(१९ सप्टेंबर) परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छतेविषयी लोकांचे प्रबोधन करण्याचा एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. 

ज्ञान प्रबोधिनीतर्फे यंदाचे वर्ष हे स्वच्छतावर्ष म्हणून घोषित केले असून यंदाच्या गणेशोत्सवात देखील स्वच्छताविषयक जनजागृती करण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेतला गेला. या उपक्रमात ४२५ सद्स्यांची २१ गटात विभागणी करण्यात आली. या गटांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी युवती यांचा सहभाग होता. सायंकाळी चार ते पाच या वेळात निगडी, बिजलीनगर, प्राधिकरण ते ट्रान्स्पोर्टनगरी या भागात विविध ठिकाणी लोकांचे प्रबोधन करण्यात आले.

त्यानंतर सायंकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कचरा व्यवस्थापनात महापालिकेचा सहभाग या विषयावर विचार मांडले. यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की, ज्ञान प्रबोधिनीने राबवलेल्या या उपक्रमामुळे ख-या अर्थाने स्वच्छता ही चळवळ होण्यास मदत होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनात घरोघरचा कचरा दररोज उचलणे ही सध्या महत्वाची समस्या झाली आहे. त्यामुळे स्वतच्या वागणुकीत बदल करुन शून्य कचरा ही संकल्पना घरातूनच निर्माण झाली पाहिजे. कचरा ही समस्या फक्त महापालिकेची नाही, मात्र जेथे कचरा निर्माण होतो तेथेच त्याचे व्यवस्थापन केले तर ही समस्या नक्कीच संपेल. व्यक्तिगतरित्या कचरा समूळपणे नष्ट करु शकलो तरच विकास होऊ शकेल. यासाठी ज्ञानप्रबोधिनीतील शिक्षकांनी एक सोपी, सुलभ पंचसूत्री तयार करुन द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जेणेकरुन सर्वसामान्य लोकांचे प्रबोधन करणे सोपे होईल आणि आपल्यासमोरील कच-याची समस्या देखील संपेल.

यावेळी या अभियानात सहभाग घेतलेल्या शिक्षक, पालकांनी आपले अनुभव कथन केले. तसेच ज्ञान प्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांनी या प्रकल्पाविषयीची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली. या वेळी मधुरा लुंकड, आदित्य शिंदे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.