Mumbai : काका-पुतण्यात ट्विटरवॉर; अजित पवार म्हणतात भाजप-राष्ट्रवादी आघाडी स्थिर सरकार देईन तर शरद पवार सांगतात, शिवसेनेसोबतच सत्ता, संभ्रम नको

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून चाललेल्या महानाट्यात आता काका-पुतण्यामध्ये होत असलेल्या ट्विटरवॉरमधून जनता चांगलीच संभ्रमात पडली आहे. कालच्या महाराजकीय नाट्यानंतर अजित पवार आज ट्विटरवर सक्रिय झाले. त्यांनी मी राष्ट्रवादीतच असून पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. तसेच भाजप सोबतची आघाडी स्थिर सरकार देईन, असे ट्विट केले. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असतानाच शरद पवार यांनी मात्र, राष्ट्रवादी महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेस सोबतच आघाडी करणार असून अजित पवार यांनी जनतेत संभ्रम निर्माण करू नये, अशा कानपिचक्याही ट्विट करून दिल्या आहेत.

सध्या महाराष्ट्रातील सत्तेचा पेचप्रसंग हा सर्वोच्च न्यायालयात गेला असून सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, काल अचानकपणे भाजपसोबत आघाडी करीत अजित पवार यांनी धक्का दिला. त्यानंतर शरद पवार यांनी हा अजित पवारांचा एकट्याचा निर्णय पक्षातील आमदार राष्ट्रवादीसोबत असे स्पष्ट केले. सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार यांना विधीमंडळ नेतेपदावरून हटवण्यात आले. तसेच राष्ट्रवादीत परत येण्यास त्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, अजित पवार यांनी आज दुपारपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर आज दुपारनंतर अजित पवार सोशल मीडियावर सक्रिय झाले. त्यांनी एकापाठोपाठ अकरा ट्विट केले. त्यात मी राष्ट्रवादीतच असून शरद पवार हेच आमचे नेते आहेत. भाजप-राष्ट्रवादी हे महाराष्ट्राला स्थिर सरकार देईन, असेही ट्विट केले. त्यामुळे संभ्रमात आणखीनच वाढ झाली. त्यातच विधीमंडळ पक्ष नेते पदावरून अजित पवारांची हकालपट्टी केली असली, तरी त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेली नाही. यापार्श्वभूमीवर सर्वांचे शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते.

त्यावर शरद पवार यांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेससोबतच आघाडी होईन, असे स्पष्ट करीत अजित पवार यांनी संभ्रम पसरवू नये, असे सांगितले. त्यामुळे सध्या काका-पुतण्यामध्ये ट्विटर वॉर रंगल्याचे चित्र दिसत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.