Sushant Rajput Case: सुशांतच्या मृत्यू प्रकरणाबाबत माझा अभ्यास नाही- सुप्रिया सुळे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांत सिंह प्रकरणात वेगळी भूमिका घेतल्यामुळे पवार कुटुंबात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते.

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावर बोलणे टाळले आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाबाबत माझा अभ्यास नाही, असे स्पष्ट सांगत यावर भाष्य करणे त्यांनी टाळले आहे.

खासदार सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. सुळे यांच्या मतदारसंघातील मोठा भाग पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. तेथील विकासकामांबाबत त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सुशांत प्रकरणावर बोलणे टाळले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांचे भाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांत सिंह प्रकरणात वेगळी भूमिका घेतल्यामुळे पवार कुटुंबात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी सुशांत सिंह प्रकरणाचा आपला अभ्यास नसल्याचे सांगत याप्रकरणी बोलणे टाळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.