Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – पुत्र प्राप्तीच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत (Indurikar Maharaj) प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देत इंदुरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील ओझरमध्ये एका कीर्तन सोहळ्यात पुत्रप्राप्ती बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आक्षेप घेतला होता.

इंदुरीकर यांचे हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला. अहमदनगर PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले होते.

या वक्तव्याबाबत इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) प्रमाणे याचिका दाखल करण्यात आली होती. प्रथमवर्ग न्यायालयाने इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. मात्र अहमदनगर सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द करत इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता.

CA Result : सीए परीक्षेचा निकाल जाहीर; 24.98 टक्के उमेदवार उत्तीर्ण

या निर्णयाच्या विरोधात ॲड. रंजना गवांदे यांनी ॲड. जितेंद्र पाटील व ॲड. नेहा कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला होता.

मात्र औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला देखील इंदुरीकर यांच्याकडून (Indurikar Maharaj) सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर यांची याचिका निकाली काढली आहे. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. यामुळे इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.