Asia Cup : सुपर फोरमध्ये भारतीय संघाचा सलग दुसरा पराभव

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – अतिशय रोमहर्षक अशा सामन्यात श्रीलंका संघाने मजबूत भारतीय संघाला अखेरच्या षटकातल्या पाचव्या चेंडूवर पाच गडी राखून पराभूत करत आशिया कप स्पर्धेतले आपले आव्हान जिवंत ठेवताना भारतीय संघाचे आव्हान मात्र अतिशय अडचणीत आणि जर तरच्या अवस्थेत आणुन ठेवले आहे.

प्रथम फलंदाजी करताना चांगल्या स्थितीत असलेल्या भारतीय संघाने जम बसल्यावर अचानकपणे आपल्या विकेट्स फेकल्याने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असलेल्या भारतीय संघाला फक्त 173 धावांवरच समाधान मानावे लागले, तर नंतर गोलंदाजी करताना श्रीलंकन सलामी जोडीला भारतीय गोलंदाज रोखु न शकल्याने श्रीलंकन संघाने जोरदार सलामी दिली, ज्यामुळे भारतीय गोलंदाज दडपणाखाली आले,ज्याचा परिणाम भारतीय संघाच्या सलग दुसऱ्या पराभवात झाला. एकंदरीतच या स्पर्धेत आतापर्यंत तरी भारतीय गोलंदाजी ही अतिशय कमकुवत अशी दिसून आलेली आहे. आता भारतीय संघ अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केले तर पाकिस्तानने लंकेला पराभूत केले तर अशा जर तरच्या समीकरणात अडकला आहे. आकर्षक आणि आक्रमक खेळी करत महत्वाच्या क्षणी केवळ 18 चेंडूत 33 धावा करणारा श्रीलंकन कर्णधार दसून शनाका सामन्याचा मानकरी ठरला.

हातात असलेल्या संधीचे वाटोळे करणे,अवघड गोष्ट सोपी करणे ही भारतीय संघाची आजची नाही अतिशय जुनी अशी सवय आहे. आशिया कप 2022 स्पर्धेतही याच जुन्या खोडीची प्रचिती आली.अतिशय छान अशी सुरुवात केल्यानंतर पाकिस्तान विरुध्दचा हातातला सामना भारतीय गोलंदाजांनी हातातुन घातला. त्यामुळे आता अंतिम फेरी गाठायची असेल तर उरलेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणे क्रमप्राप्तच होते, त्या उरलेल्या दोन सामन्यातला पहिला सामना आज श्रीलंका संघाविरुद्ध दुबईच्या मैदानावर होता. दुर्दैवाने रोहीत आज नाणेफेक हारला,शनाकाने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात कसलीही चूक केली नाही की वेळ ही लावला नाही. भारतीय संघाने आज रवी बिष्णोई ऐवजी रवीचंद्रन अश्विनला अंतीम संघात स्थान दिले.

या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली,दुखापतीनंतर संघात आलेल्या के एल राहूल अजुन तरी आपला प्रभाव पाडता आला नाही,आजही त्याची खेळी फुलण्याआधीच कोमेजली, त्याने फक्त 6 धावा केलेल्या असताना तिक्षनाने त्याला पायचीत केले,तर यानंतर या स्पर्धेत आतापर्यंत उत्तम फॉर्मात दिसलेल्या कोहलीला आज भोपळाही फोडता आला नाही, त्याला दिलशान मधुशंकाने शून्यावर त्रिफळाबाद करून भारतीय संघाची अवस्था दोन बाद 13 अशी बिकट करुन टाकली. यानंतर कर्णधार रोहित आणि युवा प्रतिभावंत सुर्यकुमार यादव ही जोडी खेळपट्टीवर होती.या जोडीने सर्व दडपण झुगारून लावत सुंदर फलंदाजी केली.आज रोहीतने सुंदर खेळी केली,बऱ्याच दिवसांपासून त्याची मोठी खेळी बाकी होती. आज ती कमी त्याने पूर्ण करत आपले 28  वे अर्धशतक केले.दुसऱ्या बाजूने त्याला सुर्यकुमार यादवनेही चांगली साथ दिली.रोहीत आज जबरदस्त खेळत आहे असे वाटत असतानाच तो 72 धावा करुन करुनारत्नेच्या गोलंदाजीवरबाद झाला,रोहीतने 41 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारत या धावा केल्या आणि सुर्यकुमार सोबत 97 धावांची महत्वपूर्ण भागीदारीही केली.आज रोहीत एक मोठी शतकी खेळी करत असेल असे वाटत असतानाच करूनारत्नेही त्याला बाद करुन रोहितच्या चाहत्यांना निराश केले.या धक्क्यातून सावरण्याआधीच सुर्यकुमारही 34 धावा करुन बाद झाला,आणि पाठोपाठ पंत,पंड्या, आणि हुडाही विशेष काहीही योगदान न देता स्वस्तातच तंबुत परतले आणि भारतीय संघाची अवस्था 3 बाद 119 वरून 7 बाद 158 अशी झाली.पंड्या आणि पंतने प्रत्येकी 17 धावा केल्या, अखेर रवी अश्विनने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने आपल्या 20 षटकात 173 धावांची मजल मारू शकला. अश्विनने 7 चेंडूत 15 धावा केल्या.

120 चेंडूत 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने चांगली सुरुवात केली.पथून निसंका आणि कुशल मेंडीस जोडीने पहिल्या तीन षटकात 17 धावांची जोरदार सुरुवात केली,निसंका जास्तच आक्रमक मूड मध्ये होता. मागिल काही वर्षांत श्रीलंका देश अतिशय अडचणीत आलेला आहे, खरेतर या आशिया कपचे आयोजकत्वही त्यांच्याकडेच होते,मात्र सर्व बाजूंनी अडचणीत असल्याने त्यांचा नाईलाज झाला आणि अरबांनी त्यांना मदतीचा हात देत ही स्पर्धा दुबई,शारजामध्ये घेत आपला शेजारधर्म पाळला.अशा कठिण परिस्थितीत श्रीलंका संघाने आपला पहिला सामना वाईट पध्दतीने पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जबरदस्त खेळ करत सुपर फोर मध्ये प्रवेश केला,तर आजही रोहित आणि सुर्यकुमार जबरदस्त फलंदाजी करत असतानाही निराश न होता टिच्चून गोलंदाजी करत बलाढ्य भारतीय संघाला 173 धावात रोखून अर्धी बाजी मारली होती,बाकी अर्धी बाजी ते फलंदाजीत पूर्ण करून भारतीय संघाला धक्का देणार का,याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.त्यांनी त्याच दृष्टीने सुरुवातही केली, त्यामुळेच पहिल्या 5 षटकात त्यांच्या नाबाद 45 धावा झाल्या होत्या.ज्यामुळे भारतीय संघ चांगलाच दडपणात आला होता.एरवी मेंडीस जोरात असतो आज निसंकाने हल्लाबोल केला, त्याने सर्वच गोलंदाजांवर आक्रमण करत आपले सहावे अर्धशतक पूर्ण करत भारतीय संघावर चांगलेच दडपण ठेवले.मात्र दडपण घेईल तो रोहीत कसला?त्याने आपला हुकुमी एक्का चहलला गोलंदाजी दिली,आणि त्याने आपल्या तिसऱ्या षटकात निसंका आणि असलंकाला बाद करुन भारतीय संघाला सामन्यात परत आणले मात्र भारतीय संघासाठी अजूनही यशाचे दरवाजे पूर्णपणे उघडले नव्हते कारण अजूनही कुशल मेंडीस खेळत होता,बघताबघता त्याने आपले 7 वे अर्धशतक पूर्ण केले,आता सामना अतिशय रंजकदार अवस्थेत होता, कारण अजूनही श्रीलंका संघाला विजयासाठी जवळपास 64 धावा हव्या होत्या, आणि भारतीय संघाला विजयासाठी काही विकेट्स,यात अश्विननेही भर घालत धनुष्का गुनतिलकाला बाद केले तर जम बसलेल्या कुशल मेंडीसला चतुर चहलने चकवले आणि भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले.यावेळी सामना आणखीनच रोमहर्षक अवस्थेत आला,कारण श्रीलंका संघाला आता विजयासाठी 30 चेंडूत 54 धावा हव्या होत्या, आणि त्यांचे जम बसलेले खेळाडू तंबूत परतले होते.पण तरीही मैदानावर कर्णधार शनाका आणि आक्रमक भानुपक्षे होते,या जोडीने आक्रमक खेळ करत सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकवण्यात यश मिळवले.

आता विजयासाठी 12 चेंडूत 21 धावा हव्या होत्या,19 वे महत्वपूर्ण षटक घेवून आला तो भुवनेश्वर कुमार.पाकिस्तान विरुद्ध 19व्या षटकात महागड्या ठरलेल्या भुवीने आजही 19 व्या षटकात धांवाची खैरात केली आणि सामना पूर्णपणे भारताच्या हातातुन निसटून  लंकेच्या हातात गेला,या षटकात भुवनेश्वरने 14 धावा देत रोहीतसह सर्वानाच निराश केले,अखेरच्या षटकात  लंकेला विजयासाठी फक्त 7 धावा हव्या होत्या आणि त्या रोखायची जबाबदारी अर्शदीपवर होती.

दुर्दैवाने त्याच्याकडे धावा कमी होत्या, आजही भुवनेश्वरने 19 व्या षटकात स्वैर गोलंदाजी टाकल्याने युवा अर्शदीपच्या कोवळ्या खांद्यावर जास्तच जबाबदारी होती, त्याने ती चांगली निभावली ,त्याने यॉर्कर्स  वर यॉर्कर्स टाकत लंकेला परेशान केले, पण पाचव्या चेंडूवर पंतने यष्टीमागे पकडलेल्या बॉलला त्याने फलंदाजाला धावबाद करण्यासाठी फेकले,पण तो थ्रो चुकल्याने एक ऐवजी दोन धावा मिळाल्याने लंका 6 गडी आणि 1 चेंडू राखून विजयी झाले आणि भारतीय संघाचा सलग दुसरा पराभव झाल्याने या स्पर्धेतले आव्हान अतिशय कठिण असे झाले आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत 8 बाद 173

रोहीत 72, सुर्यकुमार 34, पंड्या 17, पंत 17, अश्विन नाबाद 15

मधूशंका 24/3, शनाका 26/2, करुनारत्ने 27/2

पराभूत विरुद्ध

श्रीलंका 4 बाद 174

मेंडीस 57,निसंका 52,शनाका नाबाद 33,भानुपक्षे नाबाद  25

अश्विन 32/1,चहल 34/3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.